Thu, Jul 18, 2019 20:42होमपेज › Belgaon › तिळगुळाच्या गोडव्यात मकर संक्रांत साजरी

तिळगुळाच्या गोडव्यात मकर संक्रांत साजरी

Published On: Jan 15 2018 1:41AM | Last Updated: Jan 14 2018 11:55PM

बुकमार्क करा
बेळगाव : प्रतिनिधी

‘तिळगूळ घ्या, गोड गोड बोला’ अशा शुभेच्छांसह आणि तिळगुळाच्या गोडव्यात मकर संक्रांती उत्साहात साजरी करण्यात आली. मकर संक्रांतीनिमित्त विविध ठिकाणच्या धार्मिक आणि पर्यटनस्थळी नागरिकांनी गर्दी केली होती. मकर संक्रांतीचे औचित्य साधून अनेकांनी नदीस्नानाची पर्वणी साधली. सूर्याचा मकर राशीत प्रवेश होताना प्रतिवर्षी मकर संक्रांतीचा सण साजरा करण्यात येतो. परस्परातील स्नेहभाव वाढावा व आपुलकीचे नाते दृढ व्हावे, या महत्वाच्या भावनेतून रविवारी   बेळगाव परिसरात मकर संक्रांती आनंदात साजरी झाली. दिवसभर गल्लोगल्ली तिळगूळ देण्याची लगबग सुरू होती.

सायंकाळी नटूनथटून आणि पारंपरिक वेशभूषेसह सारेजण सणाचा आनंद व्यक्त करत होते. शनिवारच्या भोगी सणासाठी बनविण्यात आलेला तीळ लावलेली बाजरीची भाकरी, मिक्स भाज्या, दहीभात, चटण्या असा जेवणाचा बेत घरोघरी होता. देवदर्शनानंतर ‘तिळगूळ घ्या, गोड गोड बोला’ असे म्हणत तिळगुळाबरोबरच संक्रांतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. नुकताच जन्मलेल्या लहान मुलांना हलव्याचे दागिने घालून ‘बोरन्हाण’ केले गेले.जिव्हाळा, स्नेह निर्माण करणार्‍या संक्रांतीच्या दिवशी नातेवाईक, आप्तेष्ट, मित्रमैत्रिणी यांच्याबरोबरच संक्रांत साजरी करण्यात आली. 

संक्रांतीनिमित्त विविध मंदिरांत विशषे पूजाˆअर्चा करण्यात आली. सायंकाळी नागरिकांनी मंदिरात जाऊन दर्शनही घेतले. संक्रांतीनिमित्त कपिलेश्‍वर मंदिर, मिलिटरी महादेव मंदिर, शनेश्‍वर मंदिर, काकती, कणबर्गी सिद्धेश्‍वर मंदिर आदी ठिकाणी देवदर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. सोगल सोमनाथ, वैजनाथ, मलप्रभा नदीकाठावर हंडीभडंगनाथ, असोगा, खानापूर, एम. के. हुबळी आदी ठिकाणाहून वाहणार्‍या नदीत स्नानासाठी भाविकांनी गर्दी केली होती.