Sat, Apr 20, 2019 10:00होमपेज › Belgaon › दोन दिवसांत 2300 जणांना दंड

दोन दिवसांत 2300 जणांना दंड

Published On: Feb 23 2018 1:19AM | Last Updated: Feb 22 2018 11:43PMबेळगाव : प्रतिनिधी

शहरामध्ये दोन दिवसापासून दुचाकीस्वारांना हेल्मेटसक्ती करण्याच्या उद्देशाने पोलिस प्रशासनाने नो हेल्मेट नो पेट्रोल, अशी भूमिका घेतली आहे. यामुळे दुचाकीस्वारांना हेल्मेट परिधान करणे अपरिहार्य ठरले आहे. या आदेशानंतर पोलिसांनी दोन दिवसात 2300 जणांवर दंडात्मक कारवाई केली. दुचाकीस्वारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलिस प्रशासनाने न्यायालयाच्या आदेशानुसार हेल्मेट सक्तीची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने नो हेल्मेट नो पेट्रोलचा पर्याय हाती घेतला. या माध्यमातून प्रत्येक दुचाकीस्वाराने हेल्मेट घातलेच पाहिजे, अशी भूमिका घेतली आहे. यामुळे पेट्रोल पंप मालकांच्या साहाय्याने याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. 

या सक्तीला नागरिकांनी खुलेआम विरोध केला नसला तरी पोलिसांच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. सुरक्षेचा मुद्दा पाहिल्यास पोलिसांचा निर्णय योग्य असल्याचे मत अनेक जणांकडून व्यक्त केले जात आहे. ही सक्ती केवळ शहरी भागात असून उपनगरांसह ग्रामीण भागात याबाबत अद्याप पुरेशी जागृती नसल्याचे दिसून आले आहे. 
शेजारील महाराष्ट्रातील चंदगड, कोवाड भागातून बेळगावला येणार्‍यांना दुचाकीचालकांना याचा फटका बसत आहे.

विनाहेल्मेट येणार्‍यांना दंडात्कम कारवाईला सामोरे जावे लागत आहे. वाहनांना पेट्रोलही मिळत नसल्याने या भागातील नागरिकांची मोठी अडचण झाली आहे. यासाठी पोलिस प्रशासनाने महाराष्ट्र हद्दीतून येणार्‍या वाहनचालकांमध्ये जनजागृती करण्याच्या दृष्टीने उपक्रम हाती घेतले पाहिजेत, अशी मागणीही केली जात आहे. 

या समस्येमुळे हेल्मेटची उसनवारी होताना दिसते. पंपावर विनाहेल्मेट वाहनांमध्ये पेट्रोल घातले जात नसल्याने नागरिकांकडून एकमेकांना हेल्मेट देऊन पेट्रोल भरून घेतले जात आहे. नागरिकांची सोय होत असली तरी हेल्मेटची उसनवारी वाढली आहे. नो हेल्मेट नो पेट्रोल या निर्णयाला पेट्रोल पंप चालकांनी चांगले सहकार्य केले आहे. त्यामुळे ही मोहीम यशाच्या मार्गावर आहे. यापुढेही ही कारवाई अशीच ठेवणार असून दोन दिवसामध्ये 2300 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. या मोहिमेला कोणाकडूनच विरोध करण्यात आलेला नाही. 

-महानिंग नंदगावी, वाहतूक विभाग डीवायएसपी


पोलिस प्रशासनाच्या हेल्मेटसक्ती निर्णयाला कायद्याचा आधार नाही. मात्र नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य आहे. न्यायालयाने हेल्मेट सक्तीचा आदेश बजावला आहे. हेल्मेटविना अपघात घडल्यास विमा भरपाई दिली जाणार नसल्याचा आदेशही नुकताच जारी केला आहे. यामुळे नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने निर्णय योग्य आहे. 

-अ‍ॅड. एन. आर. लातूर
 

हेल्मेटसक्ती अन्याय्य

पोलिस आयुक्तांची ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ ही मोहीम अन्याय्य असून त्वरित मागे घ्यावी. अन्यथा याविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते गौतम शामराव गवाणे यांनी दिला आहे. दुचाकीचालकांच्या सुरक्षेसाठी हेल्मेटचा वापर करण्याची सूचना न्यायालयाने केली आहे. त्याची अंमलबजावणी सुरू आहे. मात्र ही मोहीम

राबवताना हेल्मेट नसणा़र्‍या व्यक्तीला पेट्रोलच द्यायचे नाही, हे कोणत्या कायद्यात बसते़? पोलिसांनी वाहतुकीला शिस्त लावावी, स्वतः कारवाई करावी, पण तोंड दाबून बुक्क्यांचा मार का, असा प्रश्न गवाणे यांनी उपस्थित केला आहे. बेळगावची जनता शांत आणि संयमी म्हणून अन्यायी निर्णय लादता का? पेट्रोलसाठी हेल्मेटसक्ती ही मोहीम न थांबवल्यास आंदोलन छेडू, असे गवाणे यांनी म्हटले आहे.