Fri, Apr 26, 2019 17:23होमपेज › Belgaon › लाल असो हिरवा, आम्हाला काय पर्वा

लाल असो हिरवा, आम्हाला काय पर्वा

Published On: Feb 20 2018 1:21AM | Last Updated: Feb 19 2018 8:25PMबेळगाव : प्रतिनिधी

शहरात ट्रॅफिक जॅमची समस्या तीव्र बनल्याने रहदारी विभागानेे नियमांची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. हेल्मेटसक्ती, पार्किंगस्थळे, एकेरी वाहतूक याबाबत सक्तीने कारवाई सुरू आहे. मात्र शहरातील काही शालेय विद्यार्थी व नागरिक सायकल प्रवास करताना नियम भंग करीत आहेत. लाल असो वा हिरवा, आम्हाला काय पर्वा अशा अर्विभावात सायकलस्वारांना वाहतूक नियमांची तमाच नसल्याचे दिसून येत आहे. 

शहरातील खानापूर रोड, अनगोळ नाका येथे बालिका आदर्श विद्यालय, ठळकवाडी हायस्कूल, चिटणीस हायस्कूल, स्वाध्याय विद्यामंदिर, हेरवाडकर इंग्रजी स्कूल, दिलीप दामले हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. याठिकाणी शालेय विद्यार्थी, सायकलस्वारांकडून नियम भंग होत आहे. यंदेखुट येथील सिग्नलवरून दररोज हजारो विद्यार्थी सायकलवरून ये जा करतात  मात्र त्यांच्याकडून नियमांचे पालन होत नाही. याठिकाणी लिंगराज महाविद्यालय, वनिता महाविद्यालय, बेननस्मिथ, सेंट झेविअरचे विद्यार्थी सायकलवरून मोठ्याप्रमाणात प्रवास करतात. यावेळी काहीजणांकडून वाहतूक सिग्नल नियमांचे पालन होत नाही.

रहदारी पोलिसांचा हा रोजचा अनुभव आहे. मात्र सहसा ते कारवाई करत नाहीत. आरपीडी क्रॉस येथेही हजारो विद्यार्थी सायकलवरून ये जा करतात. या ठिकाणी जीएसएस कॉलेज, आरपीडी कॉलेज, गोगटे कॉलेजच्या मॅनेजमेंट, लॉ, पॉलिटेक्निकच्या शाखा आहेत. तसेच केएलएसचे स्कूलही आहे. याठिकाणी शेकडो विद्यार्थी सायकलचा प्रवास करतात. मात्र नियम भंगामुळे येथे अनेक अपघात घडले आहेत.  जैन हेरिटेज कॉलेज, केएलई रोडवरील सिद्धरामय्या हायस्कूल, संगोळ्ळी रायण्णा बीएड कॉलेज, बाळेकुंद्री पॉलिटेक्निक येथीलही सायकलवारांना नियमभंगाबाबत सूचना दिली तर किरकोळ अपघातांबरोबर गंभीर अपघातही टाळता येतील, असे पोलिसांचेही म्हणणे आहे.