होमपेज › Belgaon › जिल्ह्यात 18 आठवडे पुरेल इतका चारा

जिल्ह्यात 18 आठवडे पुरेल इतका चारा

Published On: Apr 07 2018 1:40AM | Last Updated: Apr 06 2018 10:52PMबेळगाव : प्रतिनिधी

जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामातील झालेल्या पावसामुळे चारा उत्पादन चांगल्या प्रकारे झाले आहे. यामुळे यंदा जिल्ह्यात चाराटंचाई होणार नाही. सध्याच्या घडीला जिल्ह्यामध्ये अठरा आठवडे पुरेल इतका चारा उपलब्ध आहे, अशी माहिती जिल्हा पशुसंगोपन खात्याचे उपसंचालक डॉ. डी. एस. हवालदार यांनी दिली. गेल्या दोन वषार्ंत जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटले होते. यामुळे अनेक भागात खरिपासह रब्बी हंगामात पावसाने दडी मारली होती. जिल्ह्यात सलग दोन वर्षे शेतकर्‍यांना दुष्काळाचा सामना करावा लागला होता.

जनावरांच्या चार्‍याची कमतरता निर्माण झाली होती. जिल्ह्यातील रामदुर्ग, सौंदत्ती, चिकोडी, अथणी, हुक्केरी आदी तालुक्यांमध्ये पशुसंगोपन खात्याला चारा छावण्या सुरू कराव्या लागल्या होत्या. जिल्ह्यातील चार्‍याच्या निर्यातीवरही निर्बंध लादण्यात आले होते. ही परिस्थिती जिल्ह्यामध्ये सतत दोन वर्षे उद्भवली होती. मात्र चाराटंचाई निर्माण होण्याची कोणतीच शक्यता नाही, असे ते म्हणाले. जिल्ह्यात रब्बी हंगामातील पिकांना आवश्यक असणारे पोषक वातावरण व पाऊस झाला होता. यामुळे पिके चांगली आली होती.

चारा उत्पादनही योग्य प्रमाणात आहे. यामुळे टंचाई उद्भवणार नाही. जनावरे पाळणार्‍या शेतकर्‍यांना यंदा टंचाईला सामोरे जावे लागणार नाही. पाण्याची समस्या निर्माण होत असल्याच्या  तक्रारी येत असून पाणी पुरवठ्यासंदर्भात जिल्हा प्रशासन योग्य तो निर्णय घेणार आहे. मोठ्या जनावरांसाठी दररोज 60 लिटर तर बकरी व लहान जनावरांसाठी किमान 5 लिटर पाणी आवश्यक आहे.  वळीव पावसाची सुरुवात झाली असून अनेक भागाला झोडपले आहे. हवामान खात्यानेही यंदा शत-प्रतिशत पाऊस होण्याचा अंदाज वर्तविला आहे,   असे डॉ. हवालदार यांनी सांगितले.