Fri, May 24, 2019 21:10होमपेज › Belgaon › कुरणेच्या शेतात १२ जणांना शस्त्रप्रशिक्षण

कुरणेच्या शेतात १२ जणांना शस्त्रप्रशिक्षण

Published On: Aug 18 2018 1:00AM | Last Updated: Aug 17 2018 11:17PMबेळगाव, बंगळूर : प्रतिनिधी

पुणे येथील एका डॉक्टरसह बारापेक्षा अधिक जणांनी बेळगावातील भरत कुरणे याच्या शेतात पिस्तूल चालविण्याचे प्रशिक्षण घेतले होते. त्या सर्वांना राजेश डी. बंगेराने प्रशिक्षण दिल्याचे विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) चौकशीत पुढे आले आहे. तर बंगेराने काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रात धर्म शस्त्र सेना शिबिरात निवृत्त सैनिकाकडून प्रशिक्षण घेतल्याची माहितीही उघडकीस आली आहे. 

जांबोटीनजीक (ता. खानापूर) येथे कुरणे याच्या शेतामध्ये पिस्तूल प्रशिक्षण देण्यात आले. आपल्या शेताचा फायरिंग रेंजसारखा वापर करण्याची परवानगी कुरणेने दिली होती. येथे वेगवेगळ्या शस्त्रांचे प्रशिक्षण अनेकांनी घेतले. धावता धावता लक्ष्य गाठण्याचे प्रशिक्षणही त्यांनी घेतले. दाभोलकर हत्या प्रकरणात सीबीआयच्या अटकेत असणारा डॉ. वीरेंद्र तावडे यालाही बंगेरानेच प्रशिक्षण दिल्याची माहिती एसआयटीकडून मिळाली आहे.

बंगेराने 2001 ते 2003 पर्यंत महाराष्ट्रात झालेल्या धर्म शस्त्र सेना शिबिरात भाग घेतला होता. तेथेच त्याने शस्त्र चालविण्याचे प्र्रशिक्षण घेतले. गौरी आणि डॉ. कलबुर्गी यांच्या मारेकर्‍यांना बंगेरानेच प्रशिक्षण दिल्याचा आरोप आहे. मास्टरमाईंड अमोल काळे याच्या सूचनेनुसार 2012 पासून आतापर्यंत त्याने 60 पेक्षा अधिक जणांना प्रशिक्षण दिले आहे. तशी कबुली त्याने एसआयटीकडे दिल्याचे समजते.

1997 मध्ये महाराष्ट्रातील एका संघटनेत तो सामील झाला होता. सुरुवातीला केवळ सभा, समारंभांचे आयोजन करण्याचे काम त्याच्याकडे होते. 2001 मध्ये वरिष्ठ नेत्यांनी प्रत्येकाला शस्त्रास्त्र प्रशिक्षण घेण्याची सक्ती केली. एका निवृत्त सैनिकाने शिबिरामध्ये 60 जणांना    प्रशिक्षण दिले होते. त्याला सर्वजण सेनाधिपती म्हणून संबोधण्यात येत होते. त्यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाल्याची माहिती बंगेराने एसआयटीला दिली आहे. 

2009 मध्ये बंगेरा संघटनेतून बाहेर पडला. मात्र, कर्नाटकातील एका संघटनेत तो सामील झाला. तरीही महाराष्ट्रातील संघटनेशी तो संपर्कात होता. 2011 मध्ये काळे आणि दिगवेकर त्याच्या संपर्कात आले. आपण सुचविलेल्या मुलांना शस्त्रास्त्र प्रशिक्षण देण्याची सूचना त्यांनी केली.  धर्मरक्षणाच्या नावावर आलेल्या युवकांना बंगेराने प्रशिक्षण दिले. 
जातीय दंगलीचा अभ्यास काळेने केला होता. हुबळीमध्ये जातीय तणाव निर्माण झाला त्यावेळी गणेश मिस्कीन आणि अमित बद्दीला निवडले. गणेशवर कलबुर्गी हत्येची तर वाघमारेला गौरी हत्येची जबाबदारी देण्यात आली.