Mon, Jul 15, 2019 23:54होमपेज › Belgaon › कित्तूरनजीक अपघातात प्राचार्य ठार

कित्तूरनजीक अपघातात प्राचार्य ठार

Published On: Apr 07 2018 1:40AM | Last Updated: Apr 07 2018 12:01AMबेळगाव/निपाणी : प्रतिनिधी

नादुरुस्त लक्झरी बससमोर थांबलेले प्राचार्य त्याच बसखाली सापडून ठार झाल्याची विचित्र घटना आज कित्तूरजवळ घडली. अपघातात आणखी एक प्राचार्य जखमी आहेत. थांबलेल्या बसला ट्रकने मागून धडक दिल्याने त्या बसखाली हे दोघे प्राचार्य सापडले. सौंदलगा (इंदिरानगर, ता. निपाणी) येथील प्राचार्य शाहू भाऊ घाटगे (वय 54) असे मृताचे नाव आहे. प्राचार्य घाटगे यांच्यासमवेत असलेले त्यांचे मित्र प्राचार्य महादेव मंगू कांबळे (वय 45, रा. मोळे, ता. अथणी) हे गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर बेळगाव येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महादेव कांबळे हे कोकटनूर येथील सरकारी पदवीपूर्व महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत.

मृत घाटगे हे सदलगा येथील सरकारी पदवीपूर्व कॉलेजमध्ये प्राचार्य होते. तेे कोकटनूर (ता. अथणी) येथील   सरकारी पदवीपूर्व कॉलेजचे प्राचार्य महादेव कांबळे यांच्यासह गुरुवारी कॉलजेच्या कामासाठी बेंगळूरला गेले होते. काम आटोपून दोघेही सीबर्ड या खासगी लक्झरी बसने (केए 51 बी 3089) गावाकडे परतत होते. पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास लक्झरी बस पंक्‍चर झाल्याने चालकाने बस रस्त्याशेजारी थांबवली होती. काही प्रवासी खाली उतरुन थांबले होते. पहाटेच्या सुमारास धुके पडले होते. घाटगे व कांबळे हे दोघेही बसच्या समोर असता बंगळूरहून मुबंईकडे भरधाव वेगाने जाणार्‍या ट्रकने लक्झरी बसला जोराची धडक दिली. त्याबरोबर बस पुढे गेली आणि त्याखाली सापडल्याने घाटगेंचा जागीच मृत्यू झाला. कांबळे यांचा पाय फॅक्‍चर झाला आहे. 

अपघातानंतर रस्ते बांधकाम करणार्‍या अशोका कंपनीच्या अ‍ॅम्बुलन्ससह भरारी पथकाच्या कर्मचार्‍यांनी धाव घेत जखमी कांबळे यांना तातडीने उपचासाठी बेळगाव येथे सरकारी रूग्णालयात दाखल केले.
घटनास्थळी कित्तूरचे पीएसआय एम. जी. कुलकर्णी यांनी भेट देऊन पंचनामा केला. अपघाताचे वृत्त समजताच मयत घाटगे यांच्या नातेवाईकांसह मित्रपरिवाराने घटनास्थळाकडे धाव घेतली. सायंकाळी मृत घाटगे यांच्या मृतदेहाचे कित्तूर सरकारी रूग्णालयात विच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. रात्री घाटगे यांच्यावर सौंदलगा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शिक्षण क्षेत्रातील मान्यवर व नागरिक उपस्थित होते. या घटनेमुळे सौंदलगा गावावर शोककळा पसरली आहे. मयत घाटगे यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.
 

 

 

tags ; Belgaum,news, Bad, Luxury, Bus ,Truck, Accident,principal ,Killed,