Wed, Apr 24, 2019 20:17होमपेज › Belgaon › मनपाच्या 5 महिन्यांच्या खर्चाला मंजुरी 

मनपाच्या 5 महिन्यांच्या खर्चाला मंजुरी 

Published On: Jan 04 2018 1:00AM | Last Updated: Jan 03 2018 11:37PM

बुकमार्क करा
बेळगाव : प्रतिनिधी    

बेळगाव महानगरपालिकेच्या बैठकीत उध्दट वर्तन करणार्‍या  नगरसेविका आणि स्थायी समिती अध्यक्षा सरला हेरेकर यांच्या विरोधात मराठी सदस्यांनी बंडाचे अस्त्र उपसले होते. मराठी बाण्यापुढे नरमलेल्या स्थायी अध्यक्षा सरला हेरेकर यांनी बुधवारी सायंकाळी बैठक बोलाविली होती. त्या बैठकीत मनपाच्या 5 महिन्यांच्या खर्चाला  मंजुरी देण्यात आली आहे.  सरला हेरेकर यांच्या वर्तनामुळे  संतप्त झालेल्या मराठी सदस्यांनी लेखा स्थायी समितीच्या मागील तीन बैठकांवर बहिष्कार घातला होता.

कोरमअभावी हेरेकर याना तीन बैठका लांबणीवर टाकण्याची वेळ आली होती. मराठी नगरसेवकांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्याची जाणीव झाल्यानंतर सरला हेरेकर यानी नरमाईचे धोरण स्वीकारले. हेरेकर यांच्या नरमाईकडे पाहून लेखा  समितीच्या सदस्यांनी बुधवारी बैठक सुरळीपणे पार पाडली. या बैठकीत महापालिकेच्या 5 महिन्यांच्या लेखा समिती खर्चाला मंजुरी देण्यात आली. त्याचबरोबर शहरातील ठराविक प्रभागातीलच नव्हे तर ज्या ज्या प्रभागात उद्याने आहेत, त्या उद्यानांच्या सुधारणेसाठी निधी मंजूर करण्यात यावा, यावर सर्वांनी एकमत दर्शविले.

शहरातील काही भागात मनपाच्यावतीने परगावच्या नागरिकांसाठी रात्रीच्या निवार्‍याची सोय करण्यात आली आहे. त्याचे काम स्वयंसेवी संस्थांकडे सोपविण्यात आले आहे. मात्र अनेकांना रात्रीच्या निवारा सोयीची अद्यापही कल्पना नाही. त्यामुळे परगावाहून येणार्‍या गरीब प्रवाशांची रात्रीच्या वेळी गैरसोय होत आहे. याकडे लक्ष देऊन मध्यवर्ती बसस्थानक,  रेल्वेस्टेशन व अन्य काही सार्वजनिक ठिकाणी रात्रीच्या निवार्‍यासंदर्भात माहिती देण्यात यावी, असाही निर्णय घेण्यात  आला. 

बैठकीच्या अध्यक्षस्थानी सरला हेरेकर होत्या. रतन मासेकर, किरण सायनाक, शिवाजी कुडुचकर, मैनाबाई चौगुले, पुष्पा पर्वतराव, फईम नाईकवाडी, सभागृह सचिव लक्ष्मी निपाणीकर यांसह लेखा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.