Wed, May 27, 2020 01:22होमपेज › Belgaon › मोदगा ग्रा. पं. उपध्यक्षांवर कारवाई करा

मोदगा ग्रा. पं. उपध्यक्षांवर कारवाई करा

Published On: Jan 04 2018 1:00AM | Last Updated: Jan 03 2018 11:19PM

बुकमार्क करा
बेळगाव : प्रतिनिधी

मोदगा ग्रामपंचायतीबाबत करण्यात आलेले आरोप खोटे असून ग्रामपंचायत उपाध्यक्ष प्रकाश बाळाप्पा कड्यागोळ यांच्याकडून विकासकामांमध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करत ग्रामपंचायत सदस्यांकडून निवासी जिल्हाधिकारी सुरेश इटनाळ यांना निवेदन देण्यात आले. मोदगा ग्रामपंचायत उपाध्यक्ष प्रकाश कड्यागोळ यांच्यावर अविश्‍वास ठराव आणण्यासाठी ग्रामपंचायत सदस्यांसह अध्यक्षांनी निर्णय घेतला आहे. याबाबत ग्रामपंचायत विकास अधिकार्‍यांनाही माहिती देण्यात आली आहे. मात्र उपाध्यक्ष प्रकाश यांनी विकास अधिकार्‍यांना धमकावून अर्वाच्च  शिवीगाळ केली आहे.

तसेच विकास अधिकार्‍यांवर आरोपही केले आहेत. सदर आरोप खोटे असून ग्रा. पं. विकास अधिकार्‍यांनी अडीच वर्षामध्ये अनेक विकासकामे राबवून गावाला पुरस्कारही मिळवून दिला आहे. असे असताना उपाध्यक्ष कड्यागोळ यांच्याकडून विकास अधिकारी यांच्यासह ग्रा. पं. अध्यक्षांनाही विकास कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न चालविला आहे. उपाध्यक्षांच्या या आडमुठ्या धोरणामुळे पंचायत सदस्यही नाराज आहेत. यासाठी त्यांच्यावर अविश्‍वास ठराव आणून पदावरून हटविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सरकारी कामांमध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न चालविल्याबद्दल सर्व सदस्यांनी हा निर्णय घेतला आहे. उपाध्यक्षांकडून अधिकार्‍यांना शिवीगाळ केल्याच्या घटनेचा निषेध करण्यात येत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावेळी अण्णव्वा बळ्ळोडी, शहाजी जाधव, गंगाप्पा सत्यवगोळ, निलव्वा हेगेरी, बेबी तळवार, विजय जाधव, बाळाप्पा सुळगेकर, शिवाजी अष्टेकर, संजय अष्टेकर, उषा पाटील आदी ग्रा. पं. सदस्य उपस्थित होते.