Thu, Jul 18, 2019 06:13होमपेज › Belgaon › बेळगाव शैक्षणिकमध्ये ९५ टक्केसायकलींचे वितरण

बेळगाव शैक्षणिकमध्ये ९५ टक्केसायकलींचे वितरण

Published On: Dec 09 2017 1:42AM | Last Updated: Dec 08 2017 10:11PM

बुकमार्क करा

बेळगाव ः महेश पाटील

राज्य सरकार आणि शिक्षण खात्याने घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी प्राथमिक आणि माध्यमिक शाळांतील पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थिनींना आणि माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांना सायकलींचे वितरण करण्यात येते. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात 19536 विद्यार्थी, विद्यार्थिनींपैकी 19464 जणांना सायकलींचे वितरण करण्यात आले आहे.  बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात बेळगाव ग्रामीण, बैलहोंगल, कित्तूर, खानापूर, सौंदत्ती आणि रामदुर्ग या शैक्षणिक तालुक्यांचा समावेश होतो. बेळगाव ग्रामीणमध्ये 5042, बैलहोंगल 2732, कित्तूर 1684, खानापूर 3206, सौंदत्ती 3802, रामदुर्ग 3072 अशा एकूण 19536 विद्यार्थी, विद्यार्थिनींना सायकलींचे वितरण करण्यात येणार असून 19464 जणांना सायकलींचे वितरण करण्यात आले आहे.

केवळ 224 जणांना सायकली देणे शिल्लक आहे. मुलांसाठी 9853 आणि मुलींसाठी 9654 अशा एकूण 19507 सायकलींची जोडणी करण्यात आली आहे. त्यापैकी 19464 सायकलींचे वितरण करण्यात आले आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील बहूतांश सर्व शाळांतील विद्यार्थी, विद्यार्थिंनीना सायकलींचे वितरण करण्यात आले असून 121 विद्यार्थी व 103 विद्यार्थिनींना सायकली वितरित करावयाच्या आहेत. बैलहोंगल, कित्तूर, खानापूर, सौंदत्ती आणि रामदुर्ग तालुक्यापैकी बेळगाव ग्रामीणमधील 60 व खानापूर तालुक्यातील 164 विद्यार्थ्यांना सायकली देणे बाकी आहे. विशेष म्हणजे बेळगाव आणि खानापूर तालुक्यातील मराठी भाषिक विद्यार्थ्यांना सायकली उपलब्ध झालेल्या नाहीत. 

2016-17 सालातील रिक्त असलेल्या 28 विद्यार्थिनी आणि 1 विद्यार्थी अशा 29 जणांसह 1684 जणांना सायकली वितरित करण्यात आल्या आहेत. जानेवारी अखेरपर्यंत  सायकलींचे वितरण 
बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात येणार्‍या सहा तालुक्यांत सायकली वितरणाचे काम जवळपास पूर्णत्वास आले आहे. तांत्रिक बाबीमुळे काही ठिकाणी सायकल वितरण करण्यास अडचण आली आहे. खानापूर आणि बेळगाव तालुक्यामधील पश्‍चिम घाटात मोडणार्‍या ग्रामीण भागात सायकली पुरविण्याचे काम सुरु आहे. लवकरच सर्व विद्यार्थ्यांना सायकली उपलब्ध होणार आहेत. शिवाय खानापूर तालुक्यातील जंगल भागातील विद्यार्थ्यांना सरकारी सुविधा देण्यासाठी नवीन उपक्रम देण्याकरिता योजना हाती घेण्यात आली आहे, असे जिल्हा शिक्षणाधिकारी ए. बी. पुंडलिक यांनी सांगितले.