Tue, Mar 26, 2019 21:54होमपेज › Belgaon › १९७१ च्या युध्दस्मृतींना आज उजाळा

१९७१ च्या युध्दस्मृतींना आज उजाळा

Published On: Dec 11 2017 1:27AM | Last Updated: Dec 10 2017 11:10PM

बुकमार्क करा

बेळगाव ः संदीप तारीहाळकर 

पाकिस्तानमधील निवडणुकीत 1970 साली बांगला विचाराची आवामी लीग सत्तेत आली. मात्र पाकच्या स्थापनेपासून वर्चस्व असलेल्या पंजाबी, पठाणी राज्यकर्त्यांना लीगचे यश खुपू लागले आणि राजकीय अराजकता निर्माण झाली. पूर्व पाकिस्तानचा ताबा घेण्यासाठी पाकने सेना तैनात केली. याचवेळी बांगला विचाराच्या जनतेला स्वातंत्र्य देण्यासाठी भारताने यात उडी घेतली. यात चंदगड तालुक्यातील सात जवान शहीद झाले. यापैकीच एक जवान शंकर नागोजी मणगूतकर यांच्या पुतळ्याचे अनावरण आज 11 रोजी त्यांच्या शहीद दिनानिमित्त वेटेरेन्स हेडक्वॉर्टर्स महाराष्ट्र, गुजरात, गोवाचे कर्नल राकेशसिंग चौहान यांच्या हस्ते शिंदेवाडी-तुडीये येथील बक्षीसपत्र भूमीत होणार आहे.  या सोहळ्याने 1971 च्या युध्दातील स्मृतींना उजाळा मिळणार आहे. 

1970 मध्ये ग्रामीण भाग फारसा सुधारलेला नव्हता. तालुक्यातील हाताच्या बोटावर मोजता येणार्‍या ठिकाणीच बसेस यायच्या. शैक्षणिक वातावरण दुर्मीळच. अशा स्थितीत  काही इयत्ता शिकलेले बांधव देश रक्षणासाठी सैन्यदलात भरती व्हायचे. पाकिस्तानबरोबर दोनवेळा झालेल्या युध्दाची जाण असूनही स्वत:ची तरणीबांड पोरं देशसेवेला मोठ्या अभिमानाने धाडली जायची. यात बेळगाव येथील मराठा लाईट इन्फंट्रीने  मोठा इतिहासच घडविला  आहे. 

या वीरांपैकीच एक शंकर. त्यांचा 1945 साली जन्म. सहा भावंडांपैकी ते सर्वात मोठेे. त्यांच्यावरच सार्‍या भावंडांची जबाबदारी. तेऊरवाडी (ता. चंदगड) येथील कमळबाई यांच्याशी विवाहबध्द होऊन वयाच्या 21 व्या वर्षी म्हणजे 19 सप्टेंबर 1965 रोजी बेळगाव सेंटरमध्ये भरती झाले. 9 डिसेंबर 71 रोजी ऑपरेशनमध्ये पहाटे 4  वा. अंगावर गोळ्या झेलून ते धारातीर्थी पडले. 
त्यांच्या अगोदर केवळ दहा दिवसात चौघे तर त्यांच्यानंतर पंधरा दिवसात दोघांनी मातृभूमीसाठी बलिदान केले. या घटनेने संपूर्ण तालुका व बेळगाव सेंटरही शोकसागरात बुडाले होते.