Sun, May 26, 2019 00:37होमपेज › Belgaon › बेळगावच्या पोलिसांना मिळणार बॉम्ब निष्क्रिय करण्याचे प्रशिक्षण

बेळगावच्या पोलिसांना मिळणार बॉम्ब निष्क्रिय करण्याचे प्रशिक्षण

Published On: Mar 15 2018 1:17AM | Last Updated: Mar 15 2018 1:17AMबेळगाव : प्रतिनिधी

सध्याच्या तंत्रज्ञान युगात प्रत्येक सरकारी खात्यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. अधिकार्‍यांना नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे लागत आहे. पोलिस खातेही त्याला अपवाद नाही. त्यामुळेच बेळगावच्या पोलिस अधिकार्‍यांना बॉम्ब निष्क्रीय करण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मुंबईतील स्फोटतज्ञ बेळगावच्या पोलिसांना मार्गदर्शन करणार असून  गुरुवारीच प्रशिक्षणाला सुरुवात होईल.

बेळगाव शहर कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्रासाठी मध्यवर्ती केंद्र  आहे. यामुळे गेल्या कांही काळापासून अफिम, गांजा, चरससह स्फोटक वस्तूंंची वाहतूकही होत असल्याचा संशय पोलिसांना आहे.  अशा वस्तूंच्या अनधिकृत व्यवसाय आणि वाहतुकीवर नजर ठेवण्याबरोबरच स्फोटक वस्तू निष्क्रिय करण्यासाठी आवश्यक प्रशिक्षित मनुष्यबळ जिल्हा पोलिस दलाकडे नाही. त्यामुळेच हे प्रशिक्षण देण्यात येत आहे. स्फोटक वस्तू सापडल्यानंतर बाहेरुन अनेक वेळा सदर वस्तू निष्क्रीय करण्यासाठी बाहेरुन प्रशिक्षित पथकाला बोलवावे लागते. बंगळूरहून पथक दाखल होईपर्यंत वाट पहावी लागते. अशावेळी कोणतेही अनुचित घटना घडण्याची शक्यता असते. त्यामुळेच बॉम्बसारखा स्फोटक वस्तू निष्क्रिय करण्यासाठी अशा पथकाची अत्यंत आवश्यकता आहे. 

सध्या मुंबई सैन्यामध्ये कमांडंट पदावर सेवा बजविणार्‍या सीमा राव आणि दीपक राव या दाम्पत्याकडून हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. शहरातील पोलिस कर्मचार्‍यांना बॉम्ब निष्क्रिय करण्यासंदर्भातील प्रशिक्षण 15 मार्च रोजी सकाळी 10.30 ते 12 वाजेपर्यंत देण्यात यईल.  जिल्हा पोलिस भवन येथे या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. तपशीलवार माहिती देऊन खुल्या मैदानावर याची प्रात्यक्षिके दाखविण्यात येणार आहे. याबरोबरच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापरही कसा करावा याबद्दलही माहिती देण्यात येणार आहे. दोन महिन्यांत विधानसभा निवडणूक होणार असून, त्यामुळेही प्रशिक्षण गरजेचे असल्याचे अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.