होमपेज › Belgaon › बेळगाव पोलिस मॉडेल राबवा देशभर

बेळगाव पोलिस मॉडेल राबवा देशभर

Published On: Jun 24 2018 1:32AM | Last Updated: Jun 24 2018 12:06AMबंगळूर ः प्रतिनिधी

बेळगाव पोलिसाच्या ‘बीट आणि सबबीट सिस्टीम’मुळे कमी मनुष्यबळात कायदा आणि सुव्यवस्था चोखपणे राखली जात असल्याने या मॉडेलचे देशभरातील पोलिसांनी अनुकरण करावे, अशी सूचना केंद्रीय गृह मंत्रालयाने केली आहे. त्याचे नामकरणही बेळगाव मॉडेल असेच करण्यात आले आहे.

बेळगाव जिल्हा पोलिसप्रमुखपदी असताना डॉ. रविकांते गौडा यांनी बीट सिस्टीमबरोबरच सबबीट सिस्टीम 1 एप्रिल 2017 रोजी लागू केली. पोलिसाला बीटवर नेमणे म्हणजे विशिष्ट भागाची जबाबदारी एका पोलिसावर सोपवणे, तर सबबीट म्हणजे त्या भागातील ठरावीक समस्यांवर तोडगा काढण्याचा अधिकार त्याला देणे. 

आता  मंगळूर जिल्हा पोलिसप्रमुखपदी अससेल्या रविकांते गौडा यांनी ब्युरो ऑफ पोलिस रिसर्च अँड डेव्हलपमेंट (बीपीआर अँड डी) संस्थेसमोर सब बीटची संकल्पना नुकतीच सादर केली. नॅशनल पोलिस मिशनअंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विशिष्ट भागात कायदा व सुव्यवस्था राखणे, समुदायांमध्ये सामंजस्य वाढविणे, हा या कार्यक्रमामागचा उद्देश आहे. 

सबबीट व्यवस्थेमुळे जनता आणि पोलिस यांच्यातील संबंध सुधारतात. मनुष्यबळाचा योग्य वापर केला जात असल्याने सेवेचा दर्जाही सुधारतो. पोलिस दलाची क्षमता वाढते. प्रत्येक बीटमध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत होते. पोलिस निरीक्षकांवरील कामाचा ताण कमी होतो. तसेच वेगळा निधी खर्च करण्याची गरज नसल्याची माहिती रविकांते गौडा यांनी दिली.    

पोलिस संशोधन समितीच्या सदस्यांना बेळगाव बीट सिस्टीमचे महत्त्व पटलेे. त्यांनी याबाबतचा प्रस्ताव निवृत्त वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि तज्ज्ञांपुढे मांडला होता. तज्ञांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली तसेच समितीने या बीट व्यवस्थेचे नाव न बदलता ‘बेळगाव मॉडेल’ असेच ठेवले. 

तज्ज्ञांनी केलेल्या शिफारसीनुसार केंद्रीय अतिरिक्‍त महासंचालक परवेज हयात यांनी सर्व पोलिस महासंचालक आणि महानिरीक्षकांना परिपत्रक पाठविले आहे. केंद्रशासित राज्यांनाही याबाबतचे पत्र पाठविले आहे. बेळगाव मॉडेल सब बीट सिस्टीमचा अवलंब करण्याची सूचना करण्यात आली आहे. मात्र, ती सक्‍तीची नाही, असेही म्हणण्यात आले आहे.
बेळगाव जिल्हा पोलिसप्रमुख म्हणून सेवा बजावताना डॉ. बी. आर. रवीकांतेगौडा यांनी सब बीट सिस्टीम लागू केली होती. तत्कालिन गृहमंत्री जी.परमेश्‍वर यांनी पोलिस महानिरीक्षक आर. के. दत्ता यांना संपूर्ण राज्यात बेळगाव मॉडेल सब बीट सिस्टीम लागू करण्याचा सल्‍ला दिला होता.

काय आहे बीट व्यवस्था?

एका बीटसाठी कॉन्स्टेबल किंवा हेड कॉन्स्टेबलची नियुक्‍ती केली जाते. त्या ठिकाणी पोलिस उपनिरीक्षकाचे कर्तव्य ते बजावतात. नोटीस पाठविणे, वॉरंट जारी करणे, पोलिस तपास, चौकशी करणे, नागरी समस्यांवर चर्चा करण्याचा अधिकार त्यांना दिला जातो. स्थानिक रहिवाशांच्या बैठका घेऊन तोडगा काढण्याची जबाबदारी ते पार पाडू शकतात. बेळगाव जिल्हा पोलिसप्रमुखपदी असताना डॉ. रविकांते गौडा यांनी ही पद्धत सुरू केली.