Fri, Jan 18, 2019 06:48होमपेज › Belgaon › बेळगावच्या कत्तलखान्यांना विरोध

बेळगावच्या कत्तलखान्यांना विरोध

Published On: Aug 08 2018 1:47AM | Last Updated: Aug 07 2018 10:48PMमच्छे : प्रतिनिधी

देसूर परिसरात बेळगाव येथील कत्तलखाने स्थलांतरीत केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा सक्त इशारा देसूर व परिसरातील नागरिकांनी देसूर ग्रामपंचायतीत झालेल्या बैठकीत दिला आहे.

बेळगाव येथील कत्तलखाने कुठे स्थलांतरित करायचे, याबद्दल वरिष्ठ अधिकारी व खासदार यांच्या बैठका होत आहेत. यामध्ये बेळगावपासूनच जवळच असलेल्या देसूर ग्रा.पं. हद्दीमध्ये हे कत्तलखाने हलविण्यात यावेत यासाठी लवकरच सरकारमान्य  जमिनी शोधाव्यात असा आदेश वरिष्ठाकडून आल्याची अधिकृत माहिती समजली आहे. त्यामुळे गेल्या आठ दिवसापासून बेळगाव येथील कत्तलखाने देसूर परिसरात हलविण्याचे गुप्त काम सुरू आहे. 

याबद्दल देसूर ग्रामस्थांना सुगावा लागल्याने गावात संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे देसूर ग्रा.पं. मध्ये तातडीने बैठक बोलावून चर्चा करण्यात आली. 

बैठकीच्या अध्यक्षस्थानी ग्रा.पं. अध्यक्षा लक्ष्मी काळसेकर होत्या. उपाध्यक्ष जोतिबा पाटील यांनी  ग्रामस्थांना सांगितले की, अजून कत्तलखाना देसूर येथे हलविण्याचा प्रस्ताव ग्रा.पं.कडे आलेला नाही. सर्वत्र चर्चा सुरू आहे. जर देसूर, काटगाळी, झाडशहापूर परिसरात कत्तलखाना सुरू करण्याचा प्रस्ताव आल्यास आम्ही ग्रा.पं. कडून त्यांना मुळीच परवानगी देणार नाही. 

अशोक डोन्याणवर म्हणाले, ग्रा.पं. आणि ग्रामस्थांनीही जागरुक राहिले पाहिजे. वेळ पडल्यास आपण शेजारील गावांना बरोबर घेऊन आंदोलन छेडू. यावर ग्रामस्थांनी एकमताने संमती दर्शविली. पीडीओ सुचेता बेनकनहळ्ळी, सेक्रेटरी ईश्‍वर गुरव, गावातील नागरिक, ग्रा.पं. सदस्य उपस्थित होते.