Sun, Jul 21, 2019 01:48होमपेज › Belgaon › बेळगाव नाट्यचळवळीला हवी ऊर्जितावस्था

बेळगाव नाट्यचळवळीला हवी ऊर्जितावस्था

Published On: Feb 27 2018 2:05AM | Last Updated: Feb 26 2018 10:16PMबेळगाव : प्रतिनिधी

गेली 13 वर्षे अ. भा. मराठी नाट्य परिषद बेळगाव शाखेच्या कामात स्वत:ला झोकून दिले. उपाध्यक्ष या नात्याने काम करत असताना वीणा लोकुर यांनी सातत्याने मला डावलण्याचा प्रयत्न केला. पुढील काळात भरीव कार्य करायचे आहे. बेळगाव शहर आणि ग्रामीण भागातील गुणवान कलाकारांना  प्रोत्साहन देणे. विविध उपक्रम राबविणे. गावागावात रंगमंच उभारणे. दर्जेदार कार्यक्रमांचा आस्वाद मिळवून देणे. बेळगावच्या नाट्य चळवळीला उर्जीतावस्था प्राप्‍त करून देणे, हेच माझे ध्येय असल्याचे राजू सुतार म्हणाले.

वीणा लोकुर यांच्या हेकेखोरपणामुळे बेळगावच्या नाट्यचळवळीची मोठी हानी झाली. ती भरून काढण्यासाठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, असे मत बेळगाव शाखेचे उपाध्यक्ष राजु सुतार यांनी दै. ‘पुढारी’कडे व्यक्‍त केले.

परिषदेच्या नियामक मंडळासाठी 4 मार्चला निवडणूक आहे. सुतार म्हणाले, मी नाट्य कलाकार आहे. अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच बेळगाव शाखेत तेरा वर्षे काम करत आहे. सहा वर्षे उपाध्यक्ष आहे. लोकूर यांनी नाट्य रसिकांची दिशाभूल चालवली आहे. 

पंढरपूर संमेलनात बेळगावच्या अ. भा. नाट्य संमेलनाची घोषणा तत्कालीन सांस्कृतिकमंत्री उदय सामंत यांनी केली होती. मात्र, बेळगावच्या संमेलनाचे श्रेय स्वत: लाटण्याचा प्रयत्न लोकुर यांनी केला. नाट्य रसिकांचा उदंड प्रतिसाद आणि दीपक करंजीकर यांचे योगदान यातून बेळगावचे नाट्य संमेलन यशस्वी झाले. नंतर झालेल्या नाट्य शाखेच्या सर्वसाधारण बैठकीला लोकुर आणि नीना जठार या वादाचे खापर आपणावर येईल, या धास्तीने अनुपस्थित राहिल्या. त्या बैठकीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मी पार पाडली. आम्हाला कामाचा अनुभव नसेल तर मग लोकुर यांना आमच्यावर टीका करण्याचा अधिकार तो काय, असा सवाल सुतार यांनी केला.

मध्यंतरीच्या काळात गमावलेले अध्यक्षपद मिळविण्यासाठी लोकुर यांनी मनमानी केली. अनंत जांगळे यांच्या अध्यक्षपदाचा कालावधी बाकी असताना त्यांना लोकुर यांच्यामुळे पायउतार व्हावे लागले. महाराष्ट्राबाहेर नाट्य चळवळीसाठी मोठे योगदान दिल्याचे त्या सांगतात. परंतु त्यांच्या हेकेखोरपणामुळेच नाट्य परिषदेची शाखा बरखास्त करण्यापर्यंत मजल गेली होती. नाट्यरसिकांच्या तळमळीमुळे परिषदेचे कार्य सुरू आहे. संमेलनावेळी लोकूर यांनी मराठीविरोधातील कन्नडधार्जिण्या नेत्यांशी सहकार्याच्या नावावर संपर्क राखला होता.

नाट्य शाखेसाठी दहा लाखाच्या अनुदानातून नाटकाचे साहित्य खरेदी केले, असे त्या सांगतात. मात्र त्या साहित्याचा बेळगावच्या नाट्य मंडळींना कितपत उपयोग झाला?  सभासदांनी शुल्क भरले आहे. त्यांना नाट्य उपक्रम हवे आहेत. ते देण्याचा माझा प्रयत्न असेल, असे सुतार म्हणाले.