Mon, Aug 19, 2019 11:44होमपेज › Belgaon › बेळगाव : सांगा आम्ही जगायचं तरी कसं?

बेळगाव : सांगा आम्ही जगायचं तरी कसं?

Published On: May 26 2018 1:49AM | Last Updated: May 25 2018 11:17PMबेळगाव : प्रतिनिधी

रात्रीची अकराची वेळ, अचानक दगडफेकीला सुरवात होते काय, काचेच्या बाटल्या, विटांचे दगड, फरशीचे तुकडे, याचा खच पडतो. यातच आरडाओरड, लहान मुलांच्या किंकाळ्या, दुचाकी व चारचाकीची जाळपोळ, क्षणात असल्याचे नव्हते होते. हा प्रसंग कोणत्या चित्रपटातील नसून बेळगावमधील संवेदनशील भागातील खडक गल्ली व जालगार गल्लीतील आहे. या भागात राहणार्‍या नागरिकांनी दै.‘पुढारी’जवळ व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया बोलक्या आहेत. 

दगडफेकीला प्रत्युत्तर देण्यासाठी दोन्ही बाजूने दगडफेकीला सुरुवात होते. रस्त्याच्या बाजूला लावलेल्या दुचाकी जाळल्या जातात. दंगलखोर दंगल घडवून पळून जातात. नंतर पोलिस घटनास्थळी दाखल होऊन चोर सोडून संन्याशाला फाशी, याप्रमाणे घराघरात घुसून दोेन्ही समाजातील युवकांना ताब्यात घेतात. त्यांच्यावर खटले दाखल केले जातात. अटकसत्र मोहिम राबविताना पोलिसांकडूनच दरवाजे तोडले जातात. 

असे प्रसंग उद्भवल्यास सरंक्षण मिळावे म्हणून या भागातील नागरिकांनी घराच्या खिडक्यांना व मुख्य प्रवेशव्दाराला ग्रिलिंग करुन घेतले. कौलारु घरे असलेल्यांनी लोखंडी पत्रे व कौले घातली. ग्रिलिंगसाठी सुमारे 75 हजार रु.खर्च येतो. पत्रे घालण्यासाठी 10 ते 12 हजार खर्च आहे.  

दंगल माजविणारे स्थानिक नव्हेत

आतापर्यंत झालेल्या दंगलीचे सीसीटीव्हीचे फुटेज पाहिल्यानंतर या भागात दंगल घडविण्यात स्थानिक नागरिकांचा सहभाग नसतो, हे स्पष्ट झाले आहे. कारण दंगल घडवणे नियोजित असते.

करिअरचा प्रश्‍न ऐरणीवर 

शासकीय नोकरी अथवा खासगी नोकरीत सामावून  घेताना या भागातील युवकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत आहे. पोलिसांकडून प्रमाणपत्र मिळताना कसून तपासणी करुन मानसिक त्रास दिला जातो. या युवकांवर जातीय दंगलीचा ठपका ठेवून खटले भरले आहेत. त्यांच्या करिअरच्या वाटा बंद झाल्या आहेत.

काळ्या यादीत सामावेश

संवेदनशील भागात राहणार्‍यांना बँक, सोसायट्यामधून कर्ज मिळणे मुश्कील झाले आहे. मोबाईल घ्यायचा झाल्यास फायनान्सधारक म्हणतात. सॉरी तुम्हाला आर्थिक मदत करु शकत नाही. कारण खडक, चव्हाट गल्ली, दरबार गल्ली, खंजीर गल्ली, घी गल्ली, शिवाजीनगर, गांधीनगर भाग काळ्या यादीत आहे. आमच्या सॉफ्टवेअरमध्ये तशी तरतूद असल्याची माहिती मोबाईल दुकानदार  देेत आहेत. त्यामुळे संवेदनशील भागातील नागरिकांना हप्त्यावरती वस्तू घेताना अडचणी येत आहेत. त्याशिवाय नोकरीसाठी प्रयत्न करताना या भागातील युवकांना नोकर्‍या मिळण्यात अडचणी येत आहेत. भाडोत्री राहण्यासाठी भाडेकरु देखील या भागात येईनासे झाले आहेत. दंगलीला कंटाळून काही नागरिकांनी घरे विक्रीसाठी काढली आहेत.