Fri, Jul 19, 2019 22:03होमपेज › Belgaon › अर्थसंकल्पातून मराठी गायब,मात्र गदारोळ नावांसाठी

अर्थसंकल्पातून मराठी गायब,मात्र गदारोळ नावांसाठी

Published On: Feb 15 2018 1:55AM | Last Updated: Feb 14 2018 11:55PMबेळगाव : प्रतिनिधी

महापालिकेचा अर्थसंकल्प केवळ कन्नड आणि इंग्रजीत छापण्यात आला आहे. महापालिकेची सारी कागदपत्रे मराठी, कन्नड, इंग्रजी या तिन्ही भाषांतमध्ये असावीत, या स्वतःच्याच ठरावाचा महापालिकेला विसर पडला. तर सभागृहातील मराठी नगरसेवकांनी याबाबत मौनीबाबाची भूमिका घेतली.  दरम्यान माजी उपमहापौर आणि स्थायी समिती सदस्यांची नावे वगळल्यामुळे मात्र सभागृहात गदारोळ माजला.

बेळगाव मनपा ही सीमाभागातील मराठी भाषिकांचा मानबिंदू म्हणून ओळखली जाते. मनपाचा कारभार  कन्नडबरोबर मराठीतून चालविण्याचा ठराव यापूर्वी झालेला आहे. कागदपत्रेही मराठीतून देण्याची आवश्यकता आहे.  मात्र अर्थसंकल्प मराठीतून पुरविण्यात आला नाही. यामुळे मराठी भाषक नगरसेवकांची गोची झाली. शहराच्या विकासासंदर्भात असणार्‍या या महत्त्वपूर्ण बैठकीत त्यांना सहभागी होता आले नाही.

मनपाची सत्ता मराठी गटाकडे आहे. तरीदेखील याकडे दुर्लक्ष झाल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. सभागृहातील नगरसेवकांनी याबाबत आवाज उठविण्याचा प्रयत्न केला नाही. कानडीकरणाचा हा प्रयत्न त्यांनी गुपचूप सहन केला. यामुळे मराठी भाषिकांतून नाराजी व्यक्त होत आहे.

नावांचा अनुल्लेख

मनपा अर्थसंकल्पाततून स्थायी समिती सदस्य व माजी उपमहापौरांची नावे गायब झाली. अर्थसंकल्प प्रकाशित करताना स्थायी समिती अध्यक्षांना व्यासपीठावर न बोलावल्यामुळे  सभागृहात गोंधळ माजला. यावर आयुक्‍त शशिधर कुरेर यांनी दिलगिरी व्यक्‍त केली. यानंतर गदारोळावर पडदा पडला.

व्यासपीठावर महापौर संज्योत बांदेकर, उपमहापौर नागेश मंडोळकर होते. नगरसेविका सरला हेरेकर यांनी अर्थसंकल्प प्रकाशित करताना  स्थायी समिती सदस्यांना व्यासपीठावर बोलाविण्यात आले नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. नगरसेवकांचा हा अवमान असून सभागृहाचे कामकाज थांबविण्याची मागणी केली.

आयुक्‍तांचा खुलासा

यावर आयुक्त कुरेर यांनी खुलासा केला. ते म्हणाले, अर्थसंकल्प सादर करण्याची प्रथा मनपाच्या कामकाजात नाही. सभागृहाचे कामकाज सुरळीत व्हावे, यासाठी गटनेते, अर्थ, कर स्थायी समिती अध्यक्षांच्या उपस्थितीत प्रकाशन केले. या विषयाचा बाऊ करू नये.

अर्थसंकल्पात माजी उपमहापौर संजय शिंदे व स्थायी समिती अध्यक्ष पिंटू सिद्दिकी यांचे नाव नसल्याचे आढळून आले. यामुळे शिंदे यांनी संबंधित अधिकार्‍यावर कारवाई करावी, अशी मागणी केली. अन्यथा कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला. याला नगरसेवक रतन मासेकर यांनी पाठिंबा दिला.यावर आयुक्तांनी छपाई करताना सदर चूक झाली असून दुरुस्त करण्याचे आश्‍वासन दिले. 

बाटली जुनी, पाणी जुनेच

रतन मासेकर म्हणाले, अर्थसंकल्पात नवीन काहीच नसून बाटलीबरोबर पाणीदेखील जुनेच आहे. जुन्याच योजना नव्याने मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

गटनेते पंढरी परब म्हणाले, मनपाने उत्पन्नवाढीवर भर देणे आवश्यक आहे. केवळ कर वसुलीतून मनपाचा विकास होणार नाही. मनपावर पडणारा खर्चाचा बोजा कमी करावा लागेल. शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या सोडविण्यासाठी अपघात व आरोग्य विमा शहरहद्दीत राबवायला हवी.

आ. फिरोज सेठ यांनी अधिकार्‍यांना धारेवर धरले.  नगरसेवकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न त्यांनी नये. पूर्तता न होणार्‍या योजना अर्थसंकल्पात समाविष्ट कशाला करता,  असे सुनावले. विनायक गुंजटकर, किरण सायनाक, रमेश सोंटक्‍की यांनी महत्त्वाच्या सूचना मांडल्या. यानंतर अर्थसंकल्प दुरुस्तीसह संमत झाल्याची घोषणा महापौर बांदेकर यांनी केली.