Mon, Nov 12, 2018 23:21होमपेज › Belgaon › बेळगाव : तीन मतदारसंघांत 14 उमेदवार करोडपती

बेळगाव : तीन मतदारसंघांत 14 उमेदवार करोडपती

Published On: Apr 29 2018 2:09AM | Last Updated: Apr 29 2018 12:30AMबेळगाव ः प्रतिनिधी

बेळगाव दक्षिण, उत्तर आणि ग्रामीण या तीन मतदासंघातून 40 जण रिंगणात असून यापैकी 14 उमेदवार करोडपती आहेत. सर्वाधिक संपत्ती ग्रामीण मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार लक्ष्मी हेब्बाळकर यांची आहे. त्यांच्याकडे तब्बल 17 कोटीची संपत्ती आहे. बेळगाव उत्तरमधील एआयएमईपीचे उमेदवार अमर गोवे यांच्याकडे केवळ दहा हजार रुपये आहेत.

उमेदवारांनी अर्ज दाखल करताना दिलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये सदर माहिती दिली आहे. यातून कोट्यधीश आणि लखपती उमेदवारांची यादी समोर आली आहे.

या तीन मतदारसंघात सर्वात कमी वयाचा उमेदवार बेळगाव दक्षिण मतदारसंघातील आपचे उमेदवार सदानंद मेत्री आहेत. ते केवळ 67 वर्षाचे आहेत. उत्तरमधून निवडणूक लढविणारे म. ए. समितीचे उमेदवार आ. संभाजी पाटील 67 वर्षाचे असून ते सर्वात ज्येष्ठ आहेत.

निवडणुकीच्या रिंगणात हौशा, नवशा, गवश्यांची भाऊगर्दी झाली आहे. प्रत्येकजण राजकारणात नशीब आजमावून पाहण्याचा प्रयत्न करत आहे. समाजसेवेसाठी राजकारणात प्रवेश करताना अनेकजण लक्षाधीश असण्याबरोबर कोट्यधीशही आहेत. यामुळे उमेदवारांच्या अबब संपत्तीची चर्चा मतदारांमध्ये रंगली आहे.

उमेदवारांचे शिक्षणही चर्चेचा विषय ठरला आहे. पाचवीपासून पदव्युत्तर शिक्षण घेतलेले उमेदवार  रिंगणात आहेत. दहावी व त्यापेक्षा कमी शिक्षण झालेले तब्बल 25 जण निवडणुकीत आहेत. पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलेल्यांमध्ये केवळ सात जणांचा समावेश आहे. विशेष म्हणजे दक्षिण मतदारसंघात केवळ एक उमेदवार पदवीधर आहे.