बेळगाव: प्रतिनिधी
खरेदी केलेला मोबाईल बनावट निघाल्यामुळे तो बदलून देण्याचा तसेच भरपाई देण्याचा आदेश ग्राहक न्यायालयाने दिला आहे. बापटगल्ली येथील सरिता मोबाईल्स या दुकानातून फिर्यादी अंजली रमेश भंडारी यांनी मोबाईल खरेदी केला होता. तो मोबाईल बनावट निघाल्याने तो बदलून त्याचे सीमकार्डही बदलून देण्यात यावे, या व्यवहारामध्ये मानसिक त्रास दिल्याबद्दल 500 रु. ची भरपाई व खटल्याचा खर्च म्हणून 500 रु. फिर्यादींना देण्यात यावेत, असा निकाल बेळगाव जिल्हा ग्राहक संरक्षण न्यायालयाने दिला आहे.
अंजली भंडारी यांनी 17 नोव्हेंबर 2017 रोजी सरिता मोबाईल्स एक्सेसिरिज या दुकानातून 1200 रु. चा मोबाईल गॅरंटीसह खरेदी केला होता. घरी गेल्यानंतर त्यांनी त्या मोबाईलमध्ये सीमकार्ड घालून पाहिले असता सदर मोबाईल बनावट असल्याचे त्यांना आढळून आले. त्याबद्दल भंडारी यांनी सरिता मोबाईल्सवर ग्राहक संरक्षण न्यायालयामध्ये खटला दाखल करून भरपाईची मागणी केली होती.
खटल्यापूर्वी त्यांनी आपल्या वकीलाकडून नोटीसही पाठवून दिली होती. तरीसुद्धा सरिता मोबाईल्स मालकाने त्यांना उलट बोलून फसविण्याचाच प्रयत्न करीत होता. त्याबद्दल भंडारी यांनी सदर मोबाईल खरेदी केल्याची पावती गॅरंटी कार्ड मोबाईल्ससह न्यायालयाच्या निदर्शनाला आणून दिले होते. शहानिशा करून न्यायालयाने बनावट मोबाईल बदलून गॅरंटी कार्डसह दुसरा मोबाईल देण्याचा आदेश बजाविला. फिर्यादीतर्फे अॅड. दिनकर शेट्टी यांनी काम पाहिले.