Tue, Jul 16, 2019 21:57होमपेज › Belgaon › बेळगाव : हुतात्मा अभिवादन फेरीत ‘अमर रहे’चा घोष

बेळगाव : हुतात्मा अभिवादन फेरीत ‘अमर रहे’चा घोष

Published On: Jan 18 2018 12:16PM | Last Updated: Jan 18 2018 12:16PM

बुकमार्क करा
बेळगाव : प्रतिनिधी

17 जानेवारी 1956 रोजी झालेल्या संयुक्‍त महाराष्ट्राच्या आंदोलनात बलिदान दिलेल्यांना बुधवारी अभिवादन करण्यात आले. यानिमित्त काढण्यात आलेल्या फेरीत मराठी भाषक कार्यकर्त्यांनी ‘अमर रहे’च्या घोषणांनी बेळगाकरांचे लक्ष वेधून घेतले. हुतात्मादिनी बहुसंख्य व्यावसायिकांनी आपले व्यवसाय बंद ठेवले. 

हुतात्मा चौक येथे अभिवादन कार्यक्रम  झाला. यावेळी मराठी भाषिक नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

रामदेव गल्ली, संयुक्‍त महाराष्ट्र चौक, खडेबाजार, गणपत गल्ली, मारुती गल्ली, अनसूरकर गल्ली, रामलिंगखिंड गल्ली, किर्लोस्कर रोड मार्गावरून फेरी काढण्यात आली. अनसूरकर गल्ली येथे मधु बांदेकर व किर्लोस्कर रोड येथे महादेव बारागडी या हुतात्म्यांना अभिवादन केले. हुतात्मा चौकात हुतात्म्यांच्या वारसांचा गौरव करण्यात आला.

फेरीत म. ए.  समितीचे नेते, लोकप्रतिनिधी, विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक सहभागी होते. कार्यकर्त्यांनी अमर रहे अमर रहे, हुतात्मा अमर रहे आणि संयुक्‍त महाराष्ट्राच्या जोरदार घोषणा दिल्या. कार्यक्रमस्थळी आल्यानंतर मान्यवर व कार्यकर्त्यांनी हुतात्म्यांच्या प्रतिमेवर पुष्पचक्र वाहून अभिवादन केले. 

कोल्हापूर मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, इतिहासाचे अभ्यासक इंद्रजीत सावंत, शेकापचे संभाजी जगदाळे, आ. संभाजी पाटील, महापौर संज्योत बांदेकर, उपमहापौर नागेश मंडोळकर, मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांसह विविध संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित  होते.

कार्यक्रमावेळी आयोजित फेरीमार्गावर अनसूरकर गल्ली येथे हुतात्मा मधु बांदेकर तसेच किर्लोस्कर रोड येथे हुतात्मा महादेव बारागडी यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या कुटुंबियांचा सन्मान करण्यात आला.