Tue, Apr 23, 2019 06:33होमपेज › Belgaon › सीमाभागात मराठीचा जागर

सीमाभागात मराठीचा जागर

Published On: Feb 12 2018 1:49AM | Last Updated: Feb 11 2018 9:50PMबेळगाव : प्रतिनिधी

किणये येथील ता. म. ए. समितीने रविवारी आयोजित केलेला युवा मेळावा आणि येळ्ळूर, जांबोटी, खानापूर येथील साहित्य संमेलन यामधून सीमाभागात मराठीचा जागर करण्यात आला. किणये येथे आयोजित मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. येळ्ळूर येथील संमेलनात मराठी कागदपत्रांच्या मागणीचा ठराव मांडण्यात आला तसेच अनेक साहित्यिक, मान्यवरांच्या विचारांचा खुराक मिळाला. जांबोटी येथील गुंफण संमलेनातूनही साहित्यिक मेजवानी मिळाली.

युवा मेळाव्यात प्रकटला मराठी बाणा

किणये येथे तालुका म. ए. समितीने आयोजित केलेल्या युवामेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी सीमाप्रश्‍नाच्या लढ्याचा जागर करण्याबरोबर शिवचरित्राचा इतिहास कथन करण्यात आला. मेळाव्यामध्ये  युवकांसह महिलांची उपस्थिती लक्षणीय  होती. 

किणये येथील मराठा मंडळाच्या क्रीडांगणावर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सीमासत्याग्रही विठ्ठलराव पाटील (रणकुंडये) होते. 

दीपप्रज्वलन दिनेश ओऊळकर, मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, कार्याध्यक्ष माजी आ. मनोहर किणेकर, मालोजी अष्टेकर,  प्रकाश मरगाळे, जि. पं. सदस्या सरस्वती पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. शिवप्रतिमेचे पूजन प्रा. मधुकर पाटील यांनी केले. मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ देवून करण्यात आले. प्रांरभी ढोलताशाच्या निनादात मिरवणूक काढण्यात आली. गणेश मूर्तीचे पूजन दिनेश ओऊळकर यांनी केले.

मिरवणुकीमध्ये झांजपथक सहभागी झाले होते.  मिरवणुकीच्यासमोर अश्‍वारुढ स्वार मराठमोळ्या वेशात सहभागी झाले होते. कार्यक्रमस्थळी ठिकठिकाणी भगवे ध्वज उभारण्यात आले होते. 

मिरवणुकीत तालुक्यातील अनेक गावातील युवक, महिला आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. व्यासपीठावर ता. पं. सदस्य नारायण नलवडे,  आपासाहेब कीर्तने, एपीएमसी सदस्य आर. के. पाटील आदी उपस्थित होते. प्रास्ताविक युवा आघाडी अध्यक्ष अ‍ॅड. शाम पाटील यांनी केले. आर. के. पाटील यांनी आभार मानले.

सीमावासीयांना द्या मराठीतून कागदपत्रे

परिपत्रके आणि प्रशासकीय कागदपत्रे आपणाला मराठीतून मिळावीत अशी मागणी सीमाभागातील मराठी जनता करत आहे. ही मागणी राज्यघटनेला अनुसरून आहे. त्यामुळे कर्नाटक शासनाने मराठी भाषिकांना मराठीतून परिपत्रके, कागदपत्रे द्यावीत अशा मागणीचा ठराव येळ्ळूर मराठी ग्रामीण साहित्य संमेलनात करण्यात आला.

रविवारी  येळ्ळूर येथील दिवंगत रमेश अर्जुनराव धामणेकर संमेलन नगरीत येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्यावतीने 13 व्या मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. संमेलनाचे उद्घाटन डॉ. सोनाली सरनोबत यांच्या हस्ते करण्यात आले. व्यासपीठावर माजी महापौर सरिता पाटील, अ‍ॅड. सुधीर चव्हाण, परशराम शहापूरकर, सुरेंद्र बरगावकर, शिवप्रताप देसाई, अ‍ॅड. सागर खन्नूकर, प्रदीप देसाई, मनोहर पाटील, तानाजी पाटील, एस. एल. चौगुले, जीवनकुमार घाडी, मनोहर होसूरकर, भरतकुमार मुरकुटे, अ‍ॅड. अमर येळ्ळूरकर, रमेश माणकोजी, स्वागताध्यक्ष एल. आय. पाटील,येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाचे अध्यक्ष परशराम मोटराचे उपस्थित होते.

महाराष्ट्र सरकारने आपली सर्व शक्‍ती उभी करावी न्यायालयीन लढाई जिंकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी.  गौरी लंकेश यांच्या मारेकर्‍यांना लवकरात लवकर जेरबंद करावे. राज्य सरकारने प्राथमिक, माध्यमिक शाळांसाठी अधिक निधीची तरतूद करावी. तसेच बेळगावसह सीमाभागातील अनेक सांस्कृतिक व शैक्षणिक संस्था मराठी भाषा आणि मराठी संस्कृतीचे जतन करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. या संस्थांना महाराष्ट्र राज्य शासनाने आर्थिक मदत द्यावी, असा ठरावही संमत करण्यात आला.

मराठी कधीही संपणार नाही : डॉ. महेंद्र कदम

कोणत्याही शस्त्राचा फार काळ वापर झाला नाही. तर ते गंजून जाण्याची भीती असते. त्यासाठी युद्धाची वाट न पाहत बसता सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांना न्याय देण्यासाठी आणि माणसातला सुसंवाद वाढीस लावण्यासाठी साहित्यिकांनी लेखनाचा प्रपंच केला पाहिजे. जागतिकीकरणात मराठी भाषा संपेल अशी नाहक भीती व्यक्त केली जात आहे. मात्र मराठी कधीही संपणार नसून ती नव्या रुपाने लोकांत जिवंत राहणार आहे, असे प्रतिपादन टेंभूर्णी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेंद्र  कदम यांनी केले.

जांबोटी मल्टीपर्पज सोसायटी आणि गुंफण अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जांबोटीतील 15 व्या गुंफण सद्भावना साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते.

ते म्हणाले, जांबोटी परिसरात छ. शिवाजी महाराज व राजर्षी शाहू महाराजांचा पुतळा असणे हे महाराष्ट्राच्या बहुसांस्कृतिक व सहिष्णूपणाचे सीमाभागाशी असलेले नाते जिवंत करते. महाराष्ट्रात पानसरे आणि दाभोळकरांची झालेली हत्या आणि त्याचप्रकारे कर्नाटकात कलबुर्गी आणि गौरीलंकेश यांचे झालेले खून यामध्ये सांस्कृतिक राजकारण दडले असून  लोकशाहीच्यादृष्टीने ते धोक्याचे आहे. 

देशातील हजारो मंदिरे राजा-महाराजांनी बांधलेली असताना पंढरपूरच्या विठ्ठलाचे मंदिर मात्र कर्नाटक आणि महाराष्ट्रातील लाखो भक्तांनी उभारल्याचा इतिहास आहे. या घटनेला सांस्कृतिकदृष्ट्या विशेष महत्व आहे.