Fri, Mar 22, 2019 05:34
    ब्रेकिंग    होमपेज › Belgaon › आचारसंहितेपूर्वी हवा विकासकामांचा धडाका

आचारसंहितेपूर्वी हवा विकासकामांचा धडाका

Published On: Mar 15 2018 1:17AM | Last Updated: Mar 15 2018 1:17AMबेळगाव : प्रतिनिधी 

कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आचारसंहिता लागू होण्याआधी विकासकामे पूर्ण करण्याचा धडाका अधिकार्‍यांना आणि लोकप्रतिनिधींनी लावावा लागणार आहे. त्यासाठी जास्तीत जास्त एक महिन्याचा कालावधी आहे.एकदा निवडणुकीची घोषणा झाली की बेळगाव जिल्ह्यासह संपूर्ण कर्नाटक राज्यामध्ये आचारसंहिता लागू होईल. त्यानंतर कोणतीही विकासकामे प्रशासनाला करता येणार नाहीत. 

बेळगाव जिल्ह्यामध्ये यंदा तीव्र दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे  तीव्र पाणी टंचाईला तोंड द्यावे लागणार आहे. त्याशिवाय दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी दुष्काळी कामे राबविण्याची नितांत आवश्यकता आहे. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पाणी योजनांची व दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी दुष्काळी कामे हाती घेण्यासाठी जिल्हा प्रशासनला व जिल्हा पंचायतीला निवडणूक आयोगाकडून खास परवानगी घ्यावी लागणार आहे. निवडणूक आयोगाने त्यासाठी परवानगी दिली तरच आचारसंहितेच्या कालावधीत ती कामे करता येणार आहेत. 

बेळगाव शहरामध्ये पाणी योजनांची कामे अद्याप पूर्ण करावयाची आहेत. मागील वर्षी बेळगाव शहर व्याप्तीमध्ये 59 कूपनलिका खोदलेल्या आहेत. त्या ठिकाणी विद्युत मोटारी व पाण्याच्या टाक्या बसविण्याचे काम शिल्लक आहे. शहराच्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ती कामे तातडीने करण्याची आवश्यकता आहे. बेळगाव शहराप्रमाणेच बेळगाव जिल्हा पंचायतीला जिल्ह्यातील ग्रामीण भागातील उद्भवलेल्या तीव्र पाणी टंचाईवर मात करण्यासाठी हाती घेतलेल्या पाणी योजना व समूह गाव पाणी योजना तातडीने पूर्ण करण्याची आवश्यकता आहे. 

जिल्ह्यातील कोणत्याही भागातील तीव्र पाणी टंचाईची समस्या गावकर्‍यांनी किंवा जिल्हा पंचायत सदस्यांनी सांगितली तरी अधिकारी निवडणुकीच्या आचारसंहितेकडे बोट करण्याची शक्यता आहे. त्यासाठी जिल्ह्यातील अर्धवट पाणी योजना व समूह गाव पाणी योजना आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच पूर्ण करून घेण्याची जबाबदारी जिल्हा पंचायत अध्यक्षा आशा ऐहोळे व मुख्य कार्यकारी अधिकारी आर. रामचंद्रन यांची आहे. 

जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती येथील पाणी टंचाई दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने पाऊले उचलण्याची आवश्यकता आहे. विधानसभा निवडणूक मे महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्याचा आचारसंहिता 14 एप्रिलपासून लागू होण्याची शक्यता आहे, असे निवडणूक आयोगाने यापूर्वीच म्हटले आहे. प्रत्यक्षात आचारसंहिता त्याआधीही लागू होऊ शकते. तसे झाल तर विकासकामांसाठी खूपच कमी वेळ मिळणार आहे