Wed, Mar 20, 2019 09:08होमपेज › Belgaon › कणकुंबीजवळ अस्वलाच्या हल्यात युवक जखमी

कणकुंबीजवळ अस्वलाच्या हल्यात युवक जखमी

Published On: Jul 20 2018 1:10AM | Last Updated: Jul 20 2018 1:10AMखानापूर : प्रतिनिधी

कामावरुन घरी परतणार्‍या युवकावर अस्वलाने हल्ला चढविल्याची घटना बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारासचोर्ला मार्गावरील डेल्टा रिझॉर्टजवळ घडली. लक्ष्मण बाबू बोडगे वय-17 रा. कणकुंबी असे जखमी युवकाचे नाव असून अस्वलाने त्याच्या डाव्या हाताचा चावा घेतल्याने मनगटाजवळचे हाड मोडले आहे. त्याच्यावर बेळगाव जिल्हा इस्पितळात उपचार सुरु आहेत.

लक्ष्मण हा नेहमीप्रमाणे हॉटेलमधील काम संपवन आडवाटेने कणकुंबीच्या दिशेने येत होता. डेल्टा रिझॉर्टनजीक पाठीमागून आलेल्या अस्वलाने अचानक त्याच्यावर हल्ला चढविला. यामुळे गांगरलेल्या लक्ष्मणने हातातील छत्री उघडून अस्वलाला हुसकाविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही वेळाने अस्वलाने जंगलात पळ काढला.

डेल्टामधील कर्मचार्‍यांनी लागलीच कणकुंबीच्या वनक्षेत्रपाल कविता इरणट्टी यांना घटनेची माहिती दिली. जखमीला वनविभागाच्या जीपमधून खानापूर सरकारी दवाखान्यात आणण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करुन रात्री बेळगाव सिव्हील इस्पितळात हलविण्यात आले.

जिल्हा वनाधिकारी एम. व्ही. अमरनाथ, तालुका उपवनसंरक्षणाधिकारी सी. बी. पाटील आदींनी दवाखान्याला भेट देऊन जखमीची विचारपूस केली. शस्त्रक्रिया करुन आठ दिवसाच्या विश्रांतीनंतर त्याला घरी पाठविण्यात येणार आहे. प्रसंगावधान राखून अस्वलाचा एकट्याने सामना करुन स्वतःचा जीव वाचविलेल्या तरुणाच्या धाडसाचे कौतुक होत आहे.