खानापूर : प्रतिनिधी
खानापूरच्या वेशीपर्यंत वन्यप्राण्यांनी मजल मारली आहे. बुधवारी कौंदलजवळील शिवारात पत्नीसोबत कोळपणीच्या कामात मग्न असलेल्या गणेश आण्णू पाटील (वय 50) या शेतकर्यावर अस्वलाने हल्ला चढवून ठार केले. दुपारी तीनच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
हल्ल्यानंतरही अस्वलाने त्याच परिसरात बस्तान ठोकले असून गावा सभोवती वनविभागाच्या कर्मचार्यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मंगळवारी सायंकाळी कौंदल व होनकल परिसरातील शेतकर्यांना अस्वलाचे दर्शन झाले
होते. याबाबत रात्रीच वनविभागाला माहिती देण्यात आली होती. वनविभागाचे कर्मचारी बुधवारी सकाळपासून अस्वलाच्या हालचालीवर लक्ष ठेवून होते.
दुपारी कौंदलजवळ डोंगरावरुन अस्वल खाली आल्यानंतर शिवारात कोळपणीचे काम करणार्या गणेश पाटील यांच्यावर हल्ला केला. गणेश यांच्या तोंडावर, डोकीत व मानेवर पंजा मारल्याने कान, दाढ शरिरापासून तुटून अलग झाली होती. त्यांच्या पत्नीने आरडाओरडा करताच अस्वलाच्या मागावर असलेले वनकर्मचारी दाखल झाले.
काठ्यांच्या व अवजारांच्या सहाय्याने गणेश यांची अस्वलाच्या तावडीतून सुटका करण्यात आली. रक्तबंबाळ अवस्थेत गणेश यांना खानापूर दवाखान्यात आणण्यात आले. प्रथमोपचार करुन बेळगावमधील खासगी इस्पितळात हलविण्यात आले. मात्र डोकीतील घाव मेंदूपर्यंत वर्मी लागल्याने सायंकाळी 6 वा. त्यांचा मृत्यू झाला.
जिल्हा वनाधिकारी अमरनाथ, खानापूरचे उपवनसंरक्षणाधिकारी सी. बी. पाटील, वनक्षेत्रपाल एस. एस. निंगाणी आदींनी दवाखान्याला भेट देऊन कुटुंबियांची भेट घेतली. गणेश यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुलगे, मुलगी असा परिवार आहे.