Tue, Jul 23, 2019 06:25होमपेज › Belgaon › भ्रष्टाचाराच्या मुद्द्याने तापले रणांगण 

भ्रष्टाचाराच्या मुद्द्याने तापले रणांगण 

Published On: May 09 2018 1:50AM | Last Updated: May 09 2018 12:15AMकर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या प्रचार टप्प्यामध्ये भ्रष्टाचाराचे आरोप-प्रत्यारोप चांगलेच गाजू लागले आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर भाजपकडून भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले. तर हे आरोप सिद्ध करून दाखवावेत; अन्यथा 100 कोटी रुपयांची नुकसानभरपाई द्यावी, अशी नोटीस सिद्धरामय्या यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा आणि कर्नाटक भाजप अध्यक्ष येडियुराप्पा यांना दिली आहे. अशा या आरोप-प्रत्यारोपांनी निवडणुकीचे मैदान चांगलेच तापले आहे.दुसर्‍या बाजूला, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही केंद्र सरकावर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फार तर जनतेकडून पैसा घ्यावा आणि नीरव मोदी व ललित मोदी यांना देशात परत आणावे, असे प्रतिआव्हान दिले आहे. 

याचदरम्यान, डेमोक्रॅटिक रिफॉर्म असोसिएशनने दिलेला अहवालही विचार करायला लावणार आहे. या अहवालानुसार एकूण उमेदवारांपैकी 28 टक्के उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत. तर एकट्या भाजपच्या 224 पैकी 83 उमेदवारांवर गुन्हे दाखल आहे. हे प्रमाण 37 टक्के आहे. काँग्रेसचा यामध्ये दुसरा क्रमांक आहे. त्यांच्या 59 उमेदवारांवर (26 टक्के) गुन्हे आहेत, तर जनता दल (से)च्या 29 (15 टक्के) उमेदवारांवर गुन्हे आहेत. 309 उमेदवारांनी आपले पॅनकार्ड सादर केले नाही, तर 340 उमेदवारांनी आपल्या उत्पन्‍नाचे मार्ग सांगिलेले नाहीत.

माजी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्या काळात अवैध खाण वाटप घोटाळा गाजला होता. तत्कालीन लोकायुक्‍त एन. संतोष हेगडे यांनी या प्रकरणात काही जणांना दोषी ठरविले होते. या प्रकरणामुळे 2011 मध्ये येडियुराप्पा यांना आपले पद सोडावे लागले होते. त्यांनी केवळ पदच सोडले नाही, तर पक्षालाही रामराम ठोकला होता. मात्र, आता पुन्हा ते भाजपमध्ये असून ते पक्षाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार आहेत. दुसर्‍या बाजूला, भाजपने खाण घोटाळ्यात अडकलेल्या रेड्डी बंधूंनाही उमेदवारी दिली आहे. त्यामुळे काँग्रेसकडून भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत. तर भाजपकडूनही काँग्रेसवर आरोप होत आहेत. पाँझी घोटाळ्यावरून भाजपने मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना लक्ष केले आहे. या प्रकरणात त्यांचा सहभाग असल्याचा भाजपकडून आरोप होत आहे.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सत्ता हाती घेतल्यावर सरकारची प्रतिमा स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी अनेक दिग्गज नेत्यांना मंत्रिपदापासून दूर ठेवले होते. कारण, त्यांच्यावर विविध प्रकारचे आरोप होते. त्यांच्या पक्षाचे 32 आमदार गुन्हेगारी पार्श्‍वभूमीचे आहेत. मात्र, त्यांना पुन्हा या निवडणुकीत संधी देण्यात आली आहे.एकमेकांवर भ्रष्टाचाराची चिखलफेक होत असली, तरी निवडणुकीत मतदारांना विविध मार्गांनी भुरळ घालण्याचे काम मात्र सुरूच आहे. मतदारांना सोने, चांदीची आभूषणे वाटप केली जात असल्याची चर्चा आहे. या संशयातूनच 75 कोटींहून अधिक किमतीचे सोने व 43 कोटींहून अधिककिमतीचे चांदीचे दागिने प्राप्‍तिकर विभागाने जप्त केले आहेत. तर अबकारी विभागाने 23 कोटींहून अधिक रुपयांची दारू जप्‍त केली आहे. यावरून निवडणुकीत मतदारांना किती मोठ्या प्रमाणात आमिषे दाखविण्याचा उद्योग सुरू असेल, हे दिसून येते.

दीपक पर्वतीयार