Sun, Aug 25, 2019 12:15होमपेज › Belgaon › वाटवाघळांचा वावर...खानापुरात घबराट

वाटवाघळांचा वावर...खानापुरात घबराट

Published On: May 25 2018 1:08AM | Last Updated: May 24 2018 8:21PMखानापूर : वार्ताहर

वटवाघळांपासून  पसरणार्‍या निपाह विषाणूमुळे केरळ राज्यात आतापर्यंत 10 जणांचा बळी गेला  आहे. कित्येक जणांना याची लागण झाली असून विषाणूला रोखण्याचे कार्य युध्दपातळीवर सुरू आहे. मात्र  ज्या परिसरात वटवाघळांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. त्या ठिकाणच्या  नागरिकांनी धसका घेतला आहे. खानापूर शहरातील वनखात्याच्या विश्रामगृह आवारात कित्येक वर्षापासून वटवाघळांचे वास्तव्य आहे. त्यामुळे शहरवासीयदेखील भयभीत झाले आहेत.

निपाह विषाणूंचा प्रसार वटवाघळांच्या लाळेतून होत असल्याने त्यावर नियंत्रण राखणे अद्यापही शक्य झाले नसल्याचे समजते. वटवाघळांनी अर्धवट खाल्‍लेली फळे अथवा ती फळे इतर प्राण्यानी खाल्ल्याने त्या प्राण्यापासूनही मानवी शरीरात हा विषाणू संचारु शकतो. खानापूर आणि परिसरात या विषाणूची बाधा झाली नसली तरी नागरिकांनी खबरदारी घ्यावी, अशी सूचना तालुका वैद्याधिकारी संजय डुमगोळ यांनी केली आहे.

यापूर्वी सदर वटवाघळांचे वास्तव्य शिवाजीनगर येथील मारुती मंदिराच्या आवारात होते. मात्र काही वषार्ंपूर्वी तेथील झाडे तोडण्यात आल्याने वनखात्याने त्यांना विश्रामगृह आवारात वसविले आहे. लाखोंच्या संख्येने असणारी वटवाघळे रात्री शहरातून भीमगड अभयारण्यापर्यंत संचार करतात व पहाटे पुन्हा शहरातील आपल्या वास्तव्याच्या ठिकाणी पोहचतात. त्यांच्या या दिनचर्येचा अभ्यास करण्यासाठी अनेक पक्षीमित्र आणि पर्यावरणप्रेमींनी खानापूरला भेट दिली आहे. वटवाघळांच्या  या आश्रयस्थानामुळे खानापूर शहरवासीयांनी धसका घेतला आहे.

वटवाघळांची शिकार थांबली

निपाह हा जीवघेणा विषाणू  वटवाघळांमुळे पसरत असल्याची माहिती खेडोपाड्यात पोहचली.  त्यामुळे वटवाघळांची मोठ्या प्रमाणात होणारी शिकार थांबली आहे. वटवाघळाच्या मांसामध्ये औषधी गुण असल्याचा समज  नागरिकांत असल्याने पौर्णिमेच्या रात्री वटवाघळांची मोठी शिकार होते.  आत ती निपाह विषाणूच्या निमित्ताने थांबली आहे.