होमपेज › Belgaon › काकती येथे अग्‍नितांडव

काकती येथे अग्‍नितांडव

Published On: Mar 04 2018 1:45AM | Last Updated: Mar 03 2018 11:55PMबेळगाव : प्रतिनिधी

काकती औद्योगिक परिसरातील बसवेश्‍वर पॅकेजिंग कारखान्याला शुक्रवारी रात्री उशिरा लागलेल्या आगीत हजारो बॉक्ससह गोदामातील  दोन यंत्रे भस्मसात होऊन 30 लाखांची हानी झाली आहे.तब्बल पाच तासांच्या परिश्रमानंतर बेळगाव आणि हत्तरगी येथील अग्‍निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले.

काकती औद्योगिक परिसरात मुरघराजेंद्र बिराजदार (मूळचे रा. विजापूर) यांचा बसवेश्‍वर पॅकेजिंग कारखाना आहे. या कारखान्याचे काम गेल्या 10 वर्षांपासून सुरू असताना गेल्या 5 वर्षांपासून बिराजदार यांनी पॅकिंग युनिटसाठी गोदाम उभे केले आहे. या गोदामात पुठ्यापासून बॉक्स बनविले जातात. त्यासाठी गोदामात दोन यंत्रेही होती. 

शुक्रवारी धुलीवंदनानिमित्त कारखाना आणि गोदाम बंद होते. बंद गोदामामधून सायंकाळी 7.30 च्या सुमारास धुराचे लोट निघू लागले. गोदामाजवळच राहणार्‍या बिराजदार यांना घटनेची माहिती मिळाली. बिराजदार यांनी गोदामाजवळ जाऊन पाहणी केली असता आग लागल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर अग्‍निशामक दलास कळविण्यात आले.