होमपेज › Belgaon › राहुलच्या दौर्‍याआधीच कर्नाटकात सुंदोपसुंदी

राहुलच्या दौर्‍याआधीच कर्नाटकात सुंदोपसुंदी

Published On: Jan 30 2018 1:55AM | Last Updated: Jan 29 2018 10:53PMबंगळूर : विशेष प्रतिनिधी

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी येत्या 10 फेब्रुवारीपासून कर्नाटकाच्या 2 दिवसाच्या दौर्‍यावर येत आहेत. गेल्या ऑगस्टमध्ये बंगळूरमध्ये  इंदिरा कॅण्टीन मोहिमेचे उद्घाटन केल्यानंतर त्यांचा हा पहिलाच दौरा. पण त्याआधीच काँग्रेस आणि भाजपमध्ये सुंदोपसुंदी सुरू झाली आहे. ‘कर्नाटकात आमच्या पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकीवर प्राथमिक तयारी पूर्ण केली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत आपला पक्ष पुन्हा सत्ता हस्तगत करेल’, असा विश्‍वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला आहे.

राहुल गांधी यांच्यापाठोपाठ पंतप्रधान नरेंद्र मोदी बंगळूर दौर्‍यावर येतील. त्यामुळे सभेला कोण अधिक गर्दी खेचतो याकडे दोन्ही पक्षांचे लक्ष आहे. तर भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी भाजपाच्या संघटनात्मक कामावर लक्ष केंद्रित केले असून ‘एक तर काम करा नाही तर घरी बसा’ असा कानमंत्र त्यांनी आपल्या नेत्यांना दिला आहे. राहुल यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतरचा कर्नाटकाचा हा त्यांचा पहिलाच दौरा होय. गुजरात, हिमाचल व गोवा राज्यात भाजपने बाजी मारल्यामुळे कर्नाटकाचा किल्‍ला शाबूत राखण्यासाठी काँग्रेसचा आटापिटा सुरू आहे. सध्याची राजकीय स्थिती काँग्रेसला पोषक असल्याचा निष्कर्ष राजकीय निरीक्षकांनी काढला आहे. त्यामुळे भाजपाची चिंता वाढली आहे. 

मुख्यमंत्री सिध्दरामय्या दुसर्‍या टर्मसाठी धडपडत आहेत तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. जी. परमेश्‍वर सिध्दरामय्यांना दुसरी टर्म मिळू नये, यासाठी नवे डावपेच खेळताना दिसतात. आज जी स्थिती काँग्रेस पक्षात आहे तीच स्थिती भाजपात आहे. विधानसभा निवडणूक तोंडावर असतानादेखील राज्य भाजपातील माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते के. एस. ईश्‍वराप्पा यांच्यातील मतभेद कायम आहेत. दोघांमधील हे मतभेद ऐन निवडणुकीत उफाळण्याची शक्यता नाकारता येत नाही. राहुल गांधी प्रथम बळ्ळारी जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत असून त्यादिवशी ते होस्पेट येथील एसटी भव्य मेळाव्यास उपस्थित राहतील.

खाण घोटाळ्यावरून देशात बदनाम झालेल्या बळ्ळारीची निवड राहुल गांधींनी करून तेथील खाण सम्राटांना धक्‍का देण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो. बळ्ळारी जिल्ह्याने त्यावेळी राज्य भाजपाला मोठा आधार दिला होता. मात्र आज ती स्थिती  नाही. बळ्ळारी येथे राजकीय स्थित्यंतर घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाजपाच्या दोन आमदारांची नाराजी लपून राहिलेली नाहीे. कुंपणावर असलेल्या त्या दोघा आमदारांना काँग्रेस तिकीट देऊन त्यांना फोडण्याची व्यूहरचना सिध्दरमाय्यांनी रचली आहे. बळ्ळारी काँग्रेसमध्ये नेतेमंडळीत मतभेद असल्याने ते दूर करण्याचा प्रयत्न काँग्रेसचे प्रभारी वेणुगोपाल यांनी केले मात्र त्याचा फारसा परिणाम झाल्याचे दिसत नाही. होस्पेट येथे अनुसूचित जातींचा मेळावा, म्हैसूर येथे शेतकर्‍यांचा मेळावा व विद्यार्थ्यांशी संवाद त्याशिवाय बंगळूरमध्ये सभा असे राहुलच्या कार्यक्रमांचे नियोजन आहे.