Wed, Feb 20, 2019 02:55होमपेज › Belgaon › सुपारी खुन्यांना शस्त्रे पुरविणार्‍यास अटक

सुपारी खुन्यांना शस्त्रे पुरविणार्‍यास अटक

Published On: Dec 09 2017 1:42AM | Last Updated: Dec 09 2017 12:40AM

बुकमार्क करा

बंगळूर ः प्रतिनिधी

ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेशच्या खुन्यांना शस्त्र विकलेल्या डिलर ताहिरला बंगळूर गुन्हा अन्वेषण पथकाने अटक केल्याची माहिती शुक्रवारी गृहमंत्री रामलिंग रेड्डी यांनी दिली.  ताहिरला अटक करण्यात यश मिळाल्याने गौरी लंकेश खूनप्रकरणाच्या तपासाला गती मिळेल.

शस्त्रास्त्र विक्री वितरक ताहिरने सुपारी घेऊन खून करणार्‍या शशिधरला शस्त्र विकल्याची माहिती पोलिसांना दिली. गौरी यांच्या खुनामध्ये ताहिरचा कितपत हात आहे,  याचा तपास एसआयटी करीत आहे. गौरी लंकेश यांचा खून करण्यासाठी जे शस्त्र व गोळ्या वापरल्या त्याच्या तपासणी अहवालाची वाट पाहत असल्याचे गृहमंत्री रेड्डी यांनी सांगितले. गौरी यांच्या खुनाशी थेट संबंध असलेल्या ताहिर व शशिधर यांची माहिती एसआयटीला मिळाली असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

 गौरी आपल्या निवासस्थानी जात असताना अज्ञात खुन्यांनी जवळून त्यांच्यावर गोळीबार करून हत्या केली होती. देशभरातील पत्रकारांकडून निषेध केला जात होता.  उजव्या विचारसरणीच्या लोकांनीच त्यांची हत्या केल्याचा आरोप पत्रकार संघटनांच्या वतीने केला जात होता. खुन्यांचा शोध लावण्यासाठी कर्नाटक सरकारने विशेष पोलिस पथकाची स्थापना केली व आरोपींची माहिती देणार्‍यासाठी 10 लाख रुपयांच्या पारितोषिकाची घोषणा केली होती.