Sun, May 26, 2019 17:20होमपेज › Belgaon › क्लार्क ते मुख्यमंत्री : किती दिवसांचे?

क्लार्क ते मुख्यमंत्री : किती दिवसांचे?

Published On: May 19 2018 1:30AM | Last Updated: May 18 2018 10:21PMबंगळूर : प्रतिनिधी

बुक्कनकेरे सिध्दलिंगाप्पा येडियुराप्पा यांची सुरवात लढावू कार्यकर्ता म्हणूनच झाली. शेतकर्‍यांसाठी अनेक तर्‍हेने त्यांनी लढे दिले. त्यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1943 मध्ये मंड्या जिल्ह्यातील के. आर. पेठ तालुक्यातील बुक्कनकेरे गावामध्ये झाला. 2008  मध्ये  बी. एस. येडियुराप्पा हे मुख्यमंत्री म्हणून स्वबळावर सत्तेवर आले. परंतु त्यांच्यावर बेकायदा खनिजप्रकरणी भ्रष्टाचाराचा आरोप कर्नाटक लोकायुक्तांनी केल्यामुळे त्यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देवून कारागृहात जावे लागले. 

2008 मध्ये भाजपला 110 आमदार इतके साधे बहुमत मिळाले होते. बहुमतासाठी त्यांना तीन आमदारांची कमतरता भासली. ती कमतरता येडियुराप्पांनी ‘ऑपरेशन कमळ’ राबवून भरून काढली होती. 
येडियुराप्पांनी भाजपमधून बाहेर पडून करून कर्नाटक जनता पक्षाची स्थापना केली. 2013 च्या निवडणुकीत त्यांच्या कर्नाटक जनता पक्षाने प्रत्येक मतदार संघात मतांची विभागणी केल्यामुळे त्यावेळी भाजपाला केवळ 40 जागांवर समाधान मानावे लागले होते. त्यावेळी केजेपीला केवळ 6 जागा मिळाल्या होत्या. 

केजेपीची स्थापना करून येडियुराप्पांनी भाजपच्या राजकारणाला चांगलाच धक्का दिला होता. त्यामुळे भाजपला येडियुराप्पांना पुन्हा पक्षात येण्याची विनंती करावी लागली. त्यानुसार ते भाजपात आले व त्यांच्यावर भाजपने कर्नाटक प्रदेश अध्यक्षपदाची जबाबदारी टाकली. 

1972 मध्ये ते शिकारीपूर नगर पंचायतीमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले. त्याचवेळी त्यांची जनसंघाचे तालुका अध्यक्ष म्हणून नियुुक्ती करण्यात आली. 1975 मध्ये ते शिकारीपूर नगरपंचायतीचे अध्यक्ष बनले. आणीबाणीमध्ये त्यांना बळ्ळारी व शिमोगा कारागृहामध्ये ठेवण्यात आले होते. 1980 मध्ये ते शिकारीपूर तालुका भाजपचे अध्यक्ष बनले. 1985 मध्ये त्यांना शिमोगा जिल्हा भाजपच्या अध्यक्षपदी नियुक्त केले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. त्यांच्या जीवनाची घोडदोैड सुरूच होती. 1988 मध्ये त्यांची कर्नाटक भाजप प्रदेश अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
1983 मध्ये ते शिकारीपूरमधून पहिल्यांदा निवडून आले. त्यानंतर तेथून ते सहा वेळा आमदार म्हणून निवडून आले. 1999 मध्ये  त्यांचा निवडणुकीत पराभव झाला. परंतु त्यांची विधानपरिषदेवर नियुक्ती केल्यामुळे ते त्याठिकाणी विरोधी पक्षनेते बनले. 2004 मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये ते विधानसभेत विरोधी पक्षनेते बनले. त्यावेळी धरमसिंग हे मुख्यमंत्री होते. 

निजदशी समझोता करून त्यांनी धरमसिंग यांचे सरकार पाडले व एच. डी. कुमारस्वामी यांना मुख्यमंत्री बनवून ते उपमुख्यमंत्री बनले होते. प्रत्येकी 20 महिन्यापर्यंत मुख्यमंत्रिपदावर रहावयाचे असे त्यांचे ठरले होते. परंतु जेव्हा येडियुराप्पाची मुख्यमंत्री होण्याची वेळ ऑक्टोबर 2007 मध्ये आली त्यावेळी कुमारस्वामींनी नकार दिल्यामुळे भाजप-निजदचे सरकार पडले.त्यावेळी येडी पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले होते., त्यानंतर पुन्हा निवडणूक लागली व त्यांनी कर्नाटकामध्ये 110 जागा भाजपच्या निवडून आणल्या. त्यानंतर त्यांनी ‘ऑपरेशन कमळ’ राबवून बहुमतात येवून सरकार 
चालविले. 30 मे 2008 रोजी ते दुसर्‍यांदा मुख्यमंत्री बनले. त्यानंतर खनिज घोटाळा प्रकरणामध्ये लोकायुक्तांनी त्यांच्यावर खटले दाखल केल्याने त्यांना 31 मे 2011 रोजी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.