होमपेज › Belgaon › १७ आमदार राजीनाम्याच्या तयारीत?

१७ आमदार राजीनाम्याच्या तयारीत?

Published On: Aug 18 2018 1:00AM | Last Updated: Aug 17 2018 11:06PMबंगळूर : प्रतिनिधी

काँग्रेस-निजद आघाडी सरकारमधील 17 आमदारांनी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात राजीनामा देण्याची तयारी चालविली आहे. तसे झाल्यास सरकार कोसळून भाजपला संधी मिळण्याची शक्यता आहे.

मंत्रिपदापासून वंचित राहिल्याने दोन्ही पक्षांतील अनेक आमदार नाराज आहेत. महामंडळ, प्राधिकरणांच्या अध्यक्षपदांवर अजूनही नियुक्त्या झालेल्या नाहीत. इच्छुकांना ठोस आश्‍वासन देण्यात आलेले नाही की त्यांना विश्‍वासात घेण्यात आलेले नाही. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आल्याने किमान सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत वाट पहावी लागणार आहे. यामुळे दिवसेंदिवस नाराजी वाढत आहे. 

केंद्रातील भाजप सरकारचा कार्यकाळ संपत आला आहे. त्यामुळे विविध राजकीय पक्ष एकत्र येऊन महाआघाडी स्थापन करण्याच्या हालचाली करत आहेत. अशावेळी सरकारमधून बाहेर पडल्यास महाआघाडीला फटका बसणार आहे. नाराज आमदारांनी हीच योग्य वेळ असल्याचे जाणून वरिष्ठांना इशारा देण्याचे ठरविले आहे. 

राज्यात एकूण आमदारांची संख्या 224 आहे. मुख्यमंत्री कुमारस्वामींनी रामनगरमधील आमदारपदाचा राजीनामा दिला आहे. तसेच बागलकोटचे आमदार सिद्दू न्यामगौडा यांचे निधन झाल्याने एकूण संख्या 222 झाली आहे. 17 आमदारांनी राजीनामा दिल्यास एकूण आमदार संख्या 205 होईल. तसे झाल्यास बहुमतासाठी 103 आमदारांची गरज असेल. भाजपकडे 104 आमदार असल्याने सरकार स्थापन करता येणार आहे. भाजपचे वरिष्ठ नेते नाराज आमदारांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाली आहे.