Thu, Jun 27, 2019 10:00होमपेज › Belgaon › चन्‍नम्मा चौकातील आंदोलनांवर यापुढे बंदी? 

चन्‍नम्मा चौकातील आंदोलनांवर यापुढे बंदी? 

Published On: Jul 11 2018 1:35AM | Last Updated: Jul 10 2018 11:59PMबेळगाव : प्रतिनिधी

दोन दिवसांत चन्‍नम्मा चौकात झालेल्या आंदोलनांचा वाहनचालकांना त्रास सहन करावा लागला. तासन्तास वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागले. जिल्हाधिकार्‍यांनी याची गांभीर्याने दखल घेतली आहे. यामुळे चौकात होणार्‍या आंदोलनांवर निर्बंध घालण्यात येणार आहेत.

चौकात आंदोलनांमुळे इतर रस्त्यांवर ताण वाढून वाहतूक व्यवस्था कोलमडली होती. यामुळे चन्‍नम्मा चौकात होणार्‍या आंदोलनांचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अनेक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी, समाजसेवकांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊन चौकात होणार्‍या आंदोलनांवर बंदीची मागणी अनेक दिवसांपूर्वी केली आहे. जिल्हाधिकारी झियाउल्‍ला यांनी दखल घेतली आहे. पोलिस आयुक्‍तांशी चर्चा करून यावर निर्णय लवकरच शिक्‍कामोर्तब होणार आहे. 

बहुतांश आंदोलने चन्‍नम्मा चौकातच केली जातात. यामुळे येथील वाहतूक इतर मार्गाने वळवावी लागते. वाहतूक पोलिसांना यासाठी कसरत करावी लागते. आंदोलनांवर बंदीची मागणी जोर धरत आहे. इस्पितळांना रुग्णांना आणण्यासाठी या चौकातूनच जावे लागते. जिल्हा इस्पितळ या ठिकाणी असल्याने वाहतूक कोंडीचा फटका रुग्णांना बसण्याची शक्यता आहे. आंदोलन काळात रुग्णवाहिका अडकून पडतात. जिल्हा न्यायालय व इतर सरकारी कार्यालये याच भागात असल्याने नागरिकांना येण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. चौकातील आंदोलनामुळे होणार्‍या वाहतूक कोंडीच्या परिणाम कॉलेज रोड, काकतीवेस रोड, कोर्ट रोड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवर होतो.