Mon, May 20, 2019 08:07होमपेज › Belgaon › बाहुबली महामस्तकाभिषेकाची जय्यत तयारी

बाहुबली महामस्तकाभिषेकाची जय्यत तयारी

Published On: Jan 05 2018 1:05AM | Last Updated: Jan 04 2018 8:21PM

बुकमार्क करा
अंकली : प्रतिनिधी

जैन समाजाची काशी म्हणून जगप्रसिध्द अशा हासन जिल्ह्यातील श्रवणबेळगोळ येथील भ. गोमटेश बाहुबली यांच्या 58 फुटी मूर्तीवर येत्या फेब्रुवारीत होणारा नयनरम्य महामस्ताभिषेक सोहळा जागतिक महोत्सव व्हावा, या दृष्टीने जय्यत तयारी सुरू आहे. 

यावर्षी भ. बाहुबलींच्या मूर्तीसमोरील विद्यागिरी पर्वतावर प्रथमच जर्मन तंत्रज्ञानाचा वापर करून भव्य डोंगर उभारले असून यावर 5000 भाविक बसण्याची सोय केली आहे. दररोज सुमारे 5 लाख भाविक येण्याची शक्यता गृहित धरून तयारी सुरू आहे. दर बारा वर्षांनी होणार्‍या महामस्तकाभिषेक महोत्सवाचे वार्तांकन आणि प्रसारण करण्यासाठी देशविदेशातील प्रसार माध्यमातील प्रतिनिधींना पहिल्या दिवशी प्रवेश दिला जाणार आहे.

जगप्रसिध्द महामस्ताभिषेक सोहळ्यासाठी कर्नाटक सरकारने 175 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. हा सोहळा 17 ते 25 फेब्रुवारी असे आठ दिवस होणार आहे. 8 ते 16 फेब्रुवारी दरम्यान प्रथमच पंचकल्याणित महोत्सव होणार आहे. देशभरातून 520 हून अधिक जैन मुनी उपस्थित राहणार आहेत. महोत्सव काळात 50 लाखाहून  अधिक भाविक उपस्थित राहण्याचा अंदाज आहे. महामस्तकाभिषेक सोहळा विश्‍वाचा सांस्कृतिक सोहळा व्हावा, अशी तयारी चालल्याची माहिती श्रवणबेळगोळचे जगदगुरु भट्टारक चारुकीर्ती महास्वामीजी यांनी दिली. 

कर्नाटकातील चामुंडराय राजाने हजार वर्षापूर्वी अखंड पाषाणात 58 फुटी भगवान बाहुबलीची मूर्ती उभारली. स्थापनेपासून दर बारा वर्षांनी मूर्तीवर महामस्तकाभिषेक होतो. मूर्तीवर अभिषेकासाठी पहाड आणि समोर बसून सुमारे पाच हजार भाविकांना हा सोहळा एकावेळी पाहता येणार आहे. समोरील चंद्रगिरी पर्वतावर बसून भाविकांना उत्सव पाहता येईल. महामस्तकाभिषेक करण्यासाठी उभारलेले पहाड आणि पाच हजार भाविकांना बसण्यासाठी करण्यात आलेल्या व्यवस्थेत यावर्षी प्रथमच जर्मन तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. 7 फेब्रुवारीला उद्घाटन होईल. 16 फेब्रुवारीपर्यंत कालावधीत पंचकल्याणपर्यंत महोत्सव तर 17 ते 25 फेब्रुवारी कालावधीत महामस्तकाभिषेक सोहळा होईल. 26 फेब्रुवारीला समारोप कार्यक्रम होईल.