Tue, Oct 22, 2019 02:20होमपेज › Belgaon › खड्ड्यांना हार, समस्या हरणार?

खड्ड्यांना हार, समस्या हरणार?

Published On: Jul 20 2018 1:10AM | Last Updated: Jul 20 2018 1:10AMबेळगाव : प्रतिनिधी

शहरातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. प्रत्येक रस्त्यावर खड्डेच खड्डे दिसत आहेत. महानगरपालिका, कँण्टोन्मेंट बोर्ड व लोकप्रतिनिधींचे याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे अ‍ॅड. हर्षवर्धन पाटील, जि.पं.सदस्य रमेश गोरल व सहकार्‍यांनी खड्ड्यांना हार घालून वेगळ्या पद्धतीने आंदोलन करून प्रशासनाबद्दल रोष व्यक्त केला.  त्यानंतर जिल्हाधिकारी एस. झियाउल्ला यांना निवेदन देऊन तातडीने दखल घेण्याची मागणी केली. 

शहरातील कॉलेज रोड, गुडशेडरोड, रविवार पेठ, गणपत गल्ली, मेणसे गल्ली, भेंडी बजार, भाजी मार्केट, कोर्ट आवार, फोर्ट रोड, काँग्रेस रोड खराब झाले आहेत. याकडे मनपाने त्वरीत लक्ष देण्याची मागणी करण्यात आली. प्रशासनाचे  लक्ष वेधण्यासाठी तिसरा रेल्वे गेट ते धर्मवीर संभाजी चौकापर्यंत सुमारे 300 खड्ड्यांवर हार घालण्यात आले.  नितीन पाटील, आदीत्य पारेख, शकील मुल्ला आदी उपस्थित होते. 

बेळगावला स्मार्ट सिटीचा दर्जा देण्यात आला असला तरी विकासकामे केलीच नाहीत. रस्ते नादुरुस्त होणे, ही त्यापैकी एक मोठी समस्या. यंदा पाऊस जास्त असल्यामुळे रस्ते खराब झाले असे मनपाचे अधिकारी सांगतात. मात्र, रस्त्याची बांधणी व्यवस्थितरीत्या झाली नसल्याने रस्ते लवकर खराब होत आहे. यामुळे शहरवासीयांतून नेहमीच रोष व्यक्त केला जातो. 

जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बेळगाव खड्डेमय झाले आहे. यामुळे अपघात वाढले आहेत. तातडीने दखल घेऊन खड्डे बुजवावे, जेणेकरून अपघात कमी होतील. दुचाकीस्वार व वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे.  जिल्हाधिकार्‍यांनी निवेदन स्वीकारून दुरुस्तीची सूचना देण्याची ग्वाही दिली. WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DEeePAgbWU94pj0zgYWo19