Fri, Mar 22, 2019 07:44होमपेज › Belgaon › ‘स्मार्ट’ बेळगावात रस्तोरस्ती खड्डे

‘स्मार्ट’ बेळगावात रस्तोरस्ती खड्डे

Published On: Jun 30 2018 1:15AM | Last Updated: Jun 29 2018 8:35PMबेळगाव : प्रतिनिधी

स्मार्ट सिटीच्या दिशेने आगेकूच करणार्‍या बेळगावातील रस्ते मात्र ‘स्मार्ट’ बनत चालले आहेत. अपवादानेच एखादा अंतर्गत रस्ता विनाखड्ड्यांचा आढळेल. पण तोही खोदाई करून कधी खड्डेमय होईल, याचा नेम नाही. महापालिका झोपेचे सोंग घेऊन आहे, तर लोकप्रतिनिधींना जागे कोण करणार, हा प्रश्नच आहे.शहर, भाग्यनगर, वडगाव असो की उपनगरे सर्वच ठिकाणच्या रस्त्यांवर खड्ड्यांचे जाळेच पसरलेले आहे. काही महिन्यांपूर्वी भाग्यनगरातील चौथ्या क्रॉसवर नेहमी पाणीगळती होऊन रस्ता खचला होता. संबंधित नगरसेवक, पाणीपुरवठा मंडळाच्या अधिकार्‍यांना त्या टापूतील रहिवाशांनी सांगून पाहिले. पण सारे ढिम्मच राहिले. अखेर नागरिकांनीच त्या खड्ड्यात रोपे लावली. यामुळे वाहनचालकांना कसरत करत जावे लागत होते. अखेर मनपाला जाग आली आणि त्यांनी ते काम उरकले.

वारंवार खोदाई

रस्ता नव्याने झाला रे झाला की त्याची खोदाई तीन-चार महिन्यांत झालीच म्हणून समजा. हा बेळगाववासीयांचा नेहमीचा अनुभव आहे. नगरसेवकही नागरिकांच्या रस्ते समस्यांकडे गांभीर्याने पाहत नाहीत. ड्रेनेज, जलवाहिनी, बीएसएनएल, मोबाईल केबल, वीज वाहिन्या अशा अनेक कारणांसाठी चकाचक केलेले रस्ते खोदणे आमचा अधिकार असल्यासारखे खोदाईसत्र आरंभतात. हे काम पाऊस पडून गेल्यानंतर केले जाते. कारण पाण्यामुळे जमीन भुसभुसशीत होऊन खोदकाम सोपे जाते, असे एका कंत्राटदाराने सांगितले.

गोगटे सर्कल ते संचयनी उभा मारुतीसमोरील रस्त्यावर इतके खड्डे पडले की तो मार्ग एकेरी करण्यासाठी सिंगल बॅरिकेड उभारण्यात आला होता. हा मार्ग काही महिन्यांपूर्वी आणि त्याही आधी गेल्या गणेशोत्सवापूर्वी करण्यात आला होता. उत्सव संपला की रस्ते आपल्या मूळ रूपात येतात. रिक्षा वा इतर वाहन चालकांनी आवाज उठवला तरी त्याकडे काणाडोळा केला जातो. पुढील गणेशोत्सवापर्यंत त्यांना रस्तादुरुस्तीसाठी थांबावे लागते. तोवर पाऊस झालेला असतो, मग पारंपरिकपणे दुरुस्तीकाम हाती घेतले जाते. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येणार्‍या रस्त्यांची अवस्था याहून वेगळी नाही. काकतीवेस मार्गावर रस्ता मधोमध खोदला आहे. पावसाळ्यात पाणी आणि चिखल साचून तेथून जाणार्‍यांना अंगावर लाल फवारे उडवून घेऊनच पुढे जावे लागते. पाणी साचल्याने खड्ड्याचा अंदाज चालकांना येत नाही. यातून वादावादी उद्भवते.