Sun, Jul 21, 2019 14:51
    ब्रेकिंग    होमपेज › Belgaon › आमच्या नशिबी पायवाटांचेच ‘भाग्य’!

आमच्या नशिबी पायवाटांचेच ‘भाग्य’!

Published On: Jun 12 2018 12:51AM | Last Updated: Jun 11 2018 10:56PMखानापूर : वासुदेव चौगुले

खानापूर तालुक्यातील पंचवीसपेक्षा अधिक गावांनी अद्याप डांबरी रस्तेच पाहिले नाहीत. यामुळे पावसाळ्यात चारचाकी जाईल, अशी सोयच नसल्याने आपत्कालीन प्रसंगी मदत जाऊन पोहचेल, याची कसलीही शाश्‍वती नाही. बुलेट ट्रेनचे स्वप्न सत्यात उतरवलेल्या आपल्याच देशात केवळ रुग्णवाहिका गरजेवेळी गावापर्यंत पोहचेल. अशी रस्ते नसणारी गावे असणे म्हणजे राजकारण आणि प्रशासनाला अशोभनीय आहे. अजून किती वर्षे आम्ही पायवाटांची सोबत करावी, असा प्रश्न येथील जनता विचारत आहे.

पश्‍चिम घाटाच्या पायथ्याशी वसलेला जांबोटी, कणकुंबी, आमगाव, हेम्माडगा, गवाळी हा भाग खरे तर पावसामुळे खानापूरचीच नव्हे तर नजीकच्या तालुक्यांचीही लाईफलाईन आहे. येथे पडणार्‍या पावसामुळे नदी-नाल्यांची पाणीपातळी टिकून राहते. असे असले तरी धुवाँधार पावसामुळे केलेले कच्चे रस्ते वर्षाच्या आत वाहून जातात. रोहयोतून गावातील रस्ते सिमेंटने पांढरे करण्यात आले आहेत. मात्र गावापर्यंत पोहोचणारे संपर्क रस्तेच अद्याप मळलेल्या पायवाटेचेच असल्याने बससेवा सोडाच रिक्षाही गावापर्यंत जाऊन पोहचणार नाही. ही कित्येक गावांची अवस्था आहे.

वनखात्याचा अडसर रस्त्यांच्या विकासाआड येणारे महत्त्वाचे कारण असले तरी दुर्गम रस्ते जनतेपेक्षा वन विभागाच्या जास्त उपयोगाचे आहेत. वनकर्मचार्‍यांवरील कामाचा ताण वाढल्याने रात्री-अपरात्री जंगल भागात संचार करावा लागतो. अशावेळी पक्के रस्ते महत्त्वाचे ठरतात. अन्यथा धो-धो कोसळणारा पाऊस आणि खड्डेमय रस्ते यातून वाट काढत जंगलाचा मागोवा घेणे म्हणजे तेलाच्या हातांनी मिरी सांभाळण्यासारखे आहे.

या रस्त्यांचा विकास झाला तर त्याचा सर्वाधिक वापर व लाभ वनखात्यालाच होणार असल्याची बाब वनविभागाला पटवून देणे आवश्यक आहे. यामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी कमी पडल्यानेच रस्त्यांची कामे प्रलंबित राहिली आहेत.

वनखात्याची वाहने जाऊन बहुतांश गावांचे रस्ते रुळलेले आहेत. यामुळे कोणतीही वृक्षतोड न करता सध्या वापरात असलेल्या हद्दीपर्यंत तरी रस्त्यांचे डांबरीकरण होणे काळाची गरज आहे. प्रत्येक गावाला जोडणार्‍या रस्त्यांची सद्यस्थिती, नागरिकांचा वावर आणि झाडांचे प्रमाण याबाबत सखोल अहवाल तयार करून वनखात्याकडे जातिनिशी पाठपुरावा केल्यास रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागू शकतो. भीमगड अभयारण्याच्या हद्दीत येणार्‍या रस्त्यांसाठी केंद्रीय वन्यजीव विभागाची परवानगी सक्तीची आहे. जंगलात रस्ते करणे म्हणजे अवजड वाहतुकीचे रस्तेच असा गैरसमज या खात्याचा झाला असल्याने सरसकट सर्वच रस्ताकामांना त्यांच्याकडून विरोध दर्शविण्यात आला आहे.

जिथे संपर्क रस्त्यासारख्या पायाभूत सुविधेचीच वानवा आहे, तेथे विकासाच्या अन्य बाबींवर चर्चा करणेही गैर आहे. कृतिशील पावले हाती घेऊन लोकप्रतिनिधींनी संपर्क रस्त्यांचा प्रश्‍न निकालात काढणे आवश्यक आहे.