होमपेज › Belgaon › ‘गरीब’ 50 उमेदवारांचा खर्च भाजप पेलणार

‘गरीब’ 50 उमेदवारांचा खर्च भाजप पेलणार

Published On: Mar 18 2018 1:07AM | Last Updated: Mar 17 2018 11:46PMबंगळूर : प्रतिनिधी

पक्षासाठी प्रामाणिक कार्य करीत असलेल्या पण निवडणूक खर्चाची ऐपत नसलेल्या 50 नव्या चेहर्‍यांना उमेदवारी देऊन त्यांचा निवडणूक खर्च पूर्णपणे उचलण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे.
पक्षातील निष्ठावंत कार्यकर्ते, स्वामी, समाजसेवक, पत्रकार यांच्यासह विविध क्षेत्रातील नामवंतांना हेरून त्यांना पक्षातर्फे उमेदवारी देण्याबरोबरच संपूर्ण निवडणूक खर्च उचलण्याची सूचना पक्षश्रेष्ठींनी केली आहे.

‘मिशन 150’ हे ध्येय घेऊन रिंगणात उतरलेल्या भाजप नेत्यांना हिंदुत्वासाठी कटिबध्द असलेल्या उमेदवारांना संधी द्यायची आहे. जुन्या नेत्यांची मनधरणी करण्याऐवजी नव्या चेहर्‍यांना संधी देऊन चैतन्य पसरवावे अशी सूचना रा. स्व. संघानेही केली आहे. सध्याच्या परिस्थितीत निवडणूक पैशाशिवाय लढणे शक्य नाही. त्यामुळे उमेदवाराची पार्श्‍वभूमी, चारित्र्य, वर्तणूक पाहून त्यांचा खर्च उचलण्याचा नवा प्रयोग भाजप करणार आहे.

गेल्या निवडणुकीत कमी मताने पराभूत झालेल्या उमेदवारांना यावेळी पुन्हा संधी दिली जाणार आहे. मात्र मोठ्या फरकाने पराभूत झालेल्या दोन किंवा त्याहून अधिक वेळा पराभूत झालेल्या ठिकाणी नव्या चेहर्‍यांना संधी दिली जाणार आहे. अशा मतदारसंघाची यादीही भाजपने तयार केली आहे. मात्र भाजपने निवडलेल्या अशा किती प्रामाणिक व्यक्‍ती निवडणूक रिंगणात उतरतील हा देखील प्रश्‍न उपस्थित होत आहे.

सध्या भाजपच्या केंद्रीय समितीतर्फे खासगी सर्वेक्षण सुरू आहे. राष्ट्रीय नेत्यांनी आपला अहवाल तयार केला आहे. गेल्या आठवड्यात प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुराप्पा यांनीही आपली संभाव्य यादी पक्षश्रेष्ठींकडे सोपविली आहे. सध्या प्रतिनिधित्व करत असलेल्या आमदारांसह 100 जणांची पहिली यादी या महिन्याअखेर भाजप जाहीर करणार असल्याचे समजते.

URL : BJP,  spend, 50, poor, candidates, belgaon news