होमपेज › Belgaon › भाजपकडून स्वार्थासाठी हिंदुत्वाचा वापर

भाजपकडून स्वार्थासाठी हिंदुत्वाचा वापर

Published On: Apr 23 2018 1:14AM | Last Updated: Apr 23 2018 12:16AMखानापूर : प्रतिनिधी

काँग्रेसवर हिंदूविरोधी असल्याची टीका करणार्‍या भाजपची वाटचालही त्याचदिशेने सुरु असून राम मंदिर आणि हिंदूत्वाच्या मुद्द्याचा भाजपने केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी वापर चालविला असल्याचा घणाघाती आरोप श्रीरामसेनेचे संस्थापक प्रमोद मुतालिक यांनी केला आहे. खानापुरात पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी येत्या निवडणुकीत शिवसेना आणि श्रीरामसेना यांच्यावतीने 70 जागा लढविल्या जातील, असे जाहीर केले.

भाजपने नेहमीच श्रीरामसेनेला गृहीत धरुन राजकारण केले. श्रीरामसेनेच्या कार्यकर्त्यांनी  लाठ्या-काठ्या खाव्यात, तुरुंगवास भोगावा, पोलिसांच्या कारवाईचा सामना करावा आणि त्याचा लाभ मात्र भाजपने घ्यावा. असेच आजपर्यंत घडत आले असल्याचे त्यांनी सांगितले.70 पैकी 57 उमेदवारांची घोषणा करण्यात आली असून खानापुरातून तालुका प्रमुख पंडित ओगले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सीमाभागातील मतदारसंघात श्रीरामसेनेचे उमेदवार लढतील. तर अन्य ठिकाणी शिवसेना-श्रीरामसेना युतीच्या माध्यमातून उमेदवार उभे करणार असल्याचे मुतालिक यांनी स्पष्ट केले. पोलिस यंत्रणेला हाताशी धरुन हिंदूत्ववादी कार्यकर्त्यांना त्रास देणे हा समान कार्यक्रम भाजप-काँग्रेसने आखला असून भाजप काँग्रेसची नक्कल कॉपी  असल्याचे त्यांनी नमूद केले. अनेक गुन्हेगारांना उमेदवारी देऊन भाजपने नीतीमत्ता पायदळी तुडवली असून राममंदिर आणि हिंदूत्वाच्या नावावर मते मागण्याचा अधिकार गमावला असल्याचे त्यांनी सांगितले.

Tags :  Belgaum, BJP,  Hindutva,  selfishness