Sun, May 26, 2019 20:39होमपेज › Belgaon › जारकीहोळींच्या गडावर भाजपची नजर

जारकीहोळींच्या गडावर भाजपची नजर

Published On: Apr 13 2018 1:14AM | Last Updated: Apr 13 2018 1:14AMबेळगाव : प्रतिनिधी

जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका पार पाडणार्‍या जारकीहोळी घराण्याचा राजकीय श्रीगणेशा करणारा गोकाक मतदारसंघ  अतिसंवदेनशील मतदारसंघ म्हणून राज्यात ओळखला जातो. या मतदारसंघात जारकीहोळी बंधुचे वर्चस्व असून त्याला छेद देण्याची जोरदार तयारी भाजपने चालविली आहे.
या मतदारसंघात पालकमंत्री रमेश जारकीहोळी हे सलग चारवेळा निवडून आले आहेत. पाचव्यावेळी आपले नशीब आजमावण्यासाठी ते पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. काँग्रेसला हादरा देण्यासाठी भाजपकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. कोणत्याही परिस्थितीत पालकमंत्र्यांना पराभूत करण्याचा चंग भाजपने बांधला असला तरी मतदारातून कशाप्रकारे प्रतिसाद मिळतो, यावरच विजयाची गणिते अवलंबून आहेत.

आजवरच्या निवडणुकामध्ये या मतदारसंघात एकदाही भाजपला यशाने साथ दिलेली नाही. दोनवेळा जनतादलाचा अपवाद वगळता हा मतदार संघ सातत्याने काँग्रेसच्या ताब्यात आहे. त्याचबरोबर मागील अनेक वर्षांपासून जारकीहोळीं बंधुनी आपल्या नावाचा दबदबा या भागात निर्माण केलेला आहे. 
भाजपने या मतदारसंघ काँग्रेसकडून हिसकावून घेण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. आजवर निजदमधून रमेश जारकीहोळी यांना मागील दोन विधानसभा निवडणुकीत टक्‍कर दिलेले अशोक पुजारी सध्या भाजपमध्ये डेरेदाखल झाले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी त्यांना भाजपची उमेदवारी घोषित होण्याची शक्यता आहे.भाजपने याठिकाणी माजी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांची सभा घेतली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र सदर सभा अमित शहा यांचा दौरा स्थगित झाल्यामुळे पुन्हा एकदा होणार आहे. यामाध्यमातून मतदारसंघातील वातावरण ढवळून काढण्यात येणार आहे.

रमेश जारकीहोळी यांनीही आपल्या विजयासाठी कसून प्रयत्न चालविले आहेत. यासाठी त्यांनी थेट मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची सभा घेवून मतदारांना आवाहन केले आहे. बड्या राजकीय नेत्यांनी हजेरी लावल्यामुळे या राजकीय भागातील वातावरण तापलेे आहे.मतदारसंघात बेडर समाजाची मते लक्षणीय आहेत. या समाजाने आजवर काँग्रेसला साथ दिली आहे. यामुळे अन्य पक्षांना विजयासाठी झगडावे लागले आहे. त्याचबरोबर लिंगायत, धनगर, मुस्लिम मतेदेखील अधिक आहेत. त्यांच्या पाठिंब्यावर विजयाची गणिते अवलंबून आहेत. 

हा मतदारसंघ राज्यातील  अतिसंवेदनशील मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. यामुळे निवडणूक आयोगाकडून खास दक्षता घेण्यात येते. हा मतदारसंघ भाजप, काँग्रेस या दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेचा केल्यामुळे राजकीय घडामोडीकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.याठिकाणी अन्य पक्षांचे अस्तित्व कमी प्रमाणात आहे. परिणामी, खरी लढत भाजप व काँग्रेस पक्षामध्येच होणार आहे. अन्य पक्षांकडून केवळ अस्तित्व दाखविण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरावे लागणार आहे. 

Tags :BJP's eye , Jarkirihali fort,belgaon news