Thu, Jul 18, 2019 02:34होमपेज › Belgaon › कर्नाटक काँग्रेसमुक्‍त होणारच : नरेंद्र मोदी

कर्नाटक काँग्रेसमुक्‍त होणारच : नरेंद्र मोदी

Published On: Feb 05 2018 1:59AM | Last Updated: Feb 05 2018 12:03AM बंगळूर : प्रतिनिधी     

काँग्रेसमुक्‍त कर्नाटकचे काऊंट डाऊन सुरू झाले असून काँग्रेसला हद्दपार करण्यासाठी भाजप सर्वशक्‍तीनिशी प्रयत्न करीत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीनंतर राज्य काँग्रेसमुक्‍त होईल, असा द‍ृढ विश्‍वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्‍त केला. येथे रविवारी भाजपच्या विराट मेळाव्यात मोदी यांनी पक्षाच्या प्रचाराचा बिगुल वाजवला.  ते म्हणाले, आर्थिकद‍ृष्ट्या दुर्बल व मध्यमवर्गीयांचे जीवनमान उंचावण्यासाठी भाजप कार्य करीत आला आहे. यापुढेही दुर्बल घटक व शेतकर्‍यांच्या कल्याणासाठी भाजप वचनबद्ध राहील. सर्वसामान्य जनतेचे जीवन सुखकर कसे होईल, याकडे लक्ष देऊन कार्य करत आहोत.  

राज्याचा सर्वांगीण विकास हे आमचे ध्येय आहे. धोरण, कर्तृत्व, सुधारणा या त्रिसूत्रीतून  जनकल्याणासाठी कटिबद्ध आहोत, असे पंतप्रधान म्हणाले.   केंद्राकडून मंजूर झालेल्या योजना राज्यातील काँग्रेस सरकारने जनतेपर्यंत पोहोचविलेल्या नाहीत.  केंद्र सरकारने साडेतीन वर्षांत 2 लाख कोटींहून अधिक निधीतून योजना राबविल्या आहेत. केंद्राने राज्याला दिलेल्या अनुदानाचा काँग्रेस सरकारने दुरूपयोग केल्याचा आरोप पंतप्रधानांनी केला. मोदी यांचे सकाळी कार्यक्रमस्थळी आगमन झाल्यानंतर ‘भारत माता की जय, भाजपचा विजय असो,’ अशा घोषणांनी  कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला.