Tue, Apr 23, 2019 05:35होमपेज › Belgaon › भाजपच्या  ‘भालचंद्रा’ची  राजकीय कसोटी

भाजपच्या  ‘भालचंद्रा’ची  राजकीय कसोटी

Published On: Apr 15 2018 1:34AM | Last Updated: Apr 15 2018 1:45AMबेळगाव :  प्रतिनिधी

पक्षीय राजकारणाला बगल देत नेहमीच व्यक्तिकेंद्रीत राजकारणाला पसंती दिलेल्या आरभावी मतदारसंघात भालचंद्र जारकीहोळी यांची कसोटी लागणार आहे.  जिल्हा काँग्रेसचे सुकाणू रमेश आणि सतिश या दोघा जारकीहोळी बंधुच्या हातात असताना भाजपच्या गोटातून भालचंद्र तिसर्‍यांदा निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. यामध्ये इतर दोघे बंधू कोणती भूमिका निभावणार याबाबत उत्सुकता आहे. 

भाजपतर्फे पुन्हा एकदा भालचंद्र जारकीहोळी रिंगणात उतरणार असून मुडलगी येथे माजी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांची सभा घेण्यात आली. भालचंद्र यांनी काही दिवसापूर्वी रा. स्व. संघाचे मोहन भागवत यांची पंढरपूर मुक्‍कामी भेट  घेवून आपल्या उमेदवारी निश्‍चित केली 
आहे.

सुरूवातीच्या काळात या मतदार संघावर काँग्रेसचे वर्चस्व होते. माजी मंत्री व्ही. एल. पाटील यांना मानणारा फार मोठा मतदार  या भागात आहे. मात्र मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यापासून भाजपने वर्चस्व निर्माण केले आहे. भालचंद्र यांनी दहा वर्षात विकासकामे करून आपल्या मताधिक्यात वाढ केली आहे. यामुळे राज्यात काँग्रेस पक्षाची लाट असतानाही आरभावीत  भाजपला यश मिळाले.सध्या जिल्हा काँग्रेसच्या विजयाची जबाबदारी रमेश आणि सतीश जारकीहोळी यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे ते आरभावी मतदार संघात कोणती भूमिका घेतात, यावर विजयाची गणिते अवलंबून राहणार आहेत. राजकीय जबाबदारीला तिलांजली देवून कौटुंबिक जबाबदारीला प्राधान्य दिल्यास भाजपचा एकतर्फी विजय होण्याची शक्यता आहे.

काँग्रेस

काँग्रेसकडून सध्या माजी जि. पं. सदस्य रमेश उटगी, भरमाप्पा उप्पार, कलापगौडा पाटील यांच्या नावाची चर्चा जोरात सुरू आहे. मागील विधानसभा निवडणुकीत रमेश उटगी यांनी भालचंद्र जारकीहोळी यांना टक्कर दिली होती. त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. मात्र राजकारणातून त्यांचा पत्ता कापण्याचाही काहीजाणाकडून प्रयत्न सुरू असल्याचा आरोप काही कार्यकर्त्याकडून करण्यात येत आहे.

मतदारसंघात पक्षीय राजकारणापेक्षा व्यक्तिकेंद्रीत राजकारणाचा करिष्मा चालणार आहे. त्याचबरोबर जातीची गणितेेदेखील महत्त्वाची आहेत. या मतदारसंघात धनगर समाजाची मते निर्णायक आहेत. हा मतदार वळविण्यात विधानपरिषद सदस्य विवेक पाटील यांची भूमिकादेखील महत्वाची ठरणार आहे. 

अन्य राजकीय पक्षांचे अस्तित्व नगण्य आहे. त्यामुळे त्यांच्याकडून केवळ उमेदवार देण्यात येतो. याठिकाणी खरी लढत दुरंगी होणार असून काँग्रेसच्या उमेदवाराची प्रतीक्षा करण्यात येत आहे. 

Tags :BJP's Bhalchandra's, political test,belgaon news