Mon, May 20, 2019 20:11होमपेज › Belgaon › काँग्रेसचा बालेकिल्‍ला भेदण्यास भाजप सज्ज

काँग्रेसचा बालेकिल्‍ला भेदण्यास भाजप सज्ज

Published On: May 11 2018 1:11AM | Last Updated: May 10 2018 8:59PMबंगळूर : प्रतिनिधी

काँग्रेसचा बालेकिल्‍ला म्हणून परिचित असलेल्या यादगिरी जिल्ह्यात सर्व जागा जिंकण्यासाठी भाजपकडून जोरदार तयारी केली जात आहे. गत निवडणुकीत सुरपूर, यादगिरी, गुरूमिठकल येथे काँग्रेसने बाजी मारली होती. यंदा पक्षातील सर्व मतभेद बाजूला ठेवून भाजपने संघटना मजबूत केली असून काँग्रेसला याचा धोका निर्माण झाल्याची चर्चा आहे.सुरवातीपासूनच यादगिरी मतदारसंघात काँग्रेसचे वर्चस्व आहे. काँग्रेसतर्फे आमदार डॉ. ए. बी. मालकरड्डी येथून सहाव्यांदा रिंगणात आहेत. 2008 आणि 2013च्या निवडणुकीत विजय मिळवून आता हॅट्ट्रिकची तयारी ते करत आहेत. भाजपतर्फे व्यंकटरड्डी मुदनाळ रिंगणात आहेत. गत निवडणुकीत त्यांनी गुरूमिठकल मतदारसंघातून निवडणूक लढवून केवळ काहीच मतांनी पराभव स्वीकारला होता. निजदने अल्पसंख्याक नेते ए. सी. कोडलूर यांना उमेदवारी दिली आहे. मतदारसंघात मुस्लीम मते अधिक असल्याने याचा निजदला फायदा होऊ शकतो.

मल्‍लिकार्जुन  खर्गे यांचा हा मतदारसंघ असणार्‍या  गुरूमिठकलमध्ये काँग्रेस आणि निजदमध्ये लढाई आहे. आमदार बाबुराव चिंचणसूर पुन्हा एकदा काँग्रेस उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. निजदतर्फे नागनगौडा कंदकूर, भाजपतर्फे कोली समाजातील सायबण्णा बोरबंड रिंगणात आहेत. गेल्या 50 वर्षांपासून येथे काँग्रेसचे वर्चस्व आहे. मल्‍लिकार्जुन खर्गे यांचा हा मतदारसंघ असून यंदा भाजपने कोणत्याही कारणास्तव मतदारसंघात बदल घडविण्याचा पण केला आहे. त्याला कितपत यश मिळते, ते निकालानंतरच समजेल. 

सुरपूरमध्ये दरवेळी अटीतटीची निवडणूक होते. पक्षापेक्षा व्यक्‍तीचा प्रभाव येथे महत्त्वाचा आहे. काँग्रेसतर्फे आमदार राजा व्यंकटप्पा नायक, भाजपतर्फे माजी मंत्री नरसिंह नायक (राजूगौडा) रिंगणात असून निजदने राजा कृष्णन नायक यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेस आणि भाजपमध्ये थेट लढत होण्याची शक्यता आहे. निजदचे कृष्णप्पा नायक यांना मिळणार्‍या मतावर भाजप आणि काँग्रेसचा विजय अवलंबून आहे.दोन राजकीय घराण्यांमध्ये नेहमीच प्रतिष्ठेची बनलेल्या शहापुरात तिरंगी लढत शक्य आहे. काँग्रेसचा त्याग करून निजदमध्ये प्रवेश केलेले अमीनरड्डी याळगी रिंगणात आहेत. आमदार गुरू पाटील भाजपतर्फे आणि  आमदार शरणबसप्पगौडा दर्शनापूर काँग्रेसतर्फे रिगणात आहेत. अमीनरड्डी यांनी मतदारसंघात लोकसंपर्क वाढविल्याने दोन्ही राष्ट्रीय पक्षांसाठी ते आव्हान बनले आहेत.