Mon, Jun 17, 2019 03:06होमपेज › Belgaon › काँग्रेस बालेकिल्ल्यात भाजपची धडपड

काँग्रेस बालेकिल्ल्यात भाजपची धडपड

Published On: May 08 2018 1:55AM | Last Updated: May 07 2018 8:38PMबेळगाव : प्रतिनिधी

काँग्रेस पक्षाचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष  मंत्री दिनेश गुंडूराव यांची राजकीय कसोटी त्यांच्या परंपरागत गांधीनगर मतदारसंघात लागणार आहे. याठिकाणी काँग्रेसला घेरण्यासाठी भाजपने जोरदार तयारी चालविली आहे. यामुळे दिनेश गुंडूराव यांना विजयासाठी चांगलाच घाम गाळावा लागणार आहे.

गांधीनगर हा मतदारसंघ बृहन बंगळूर  मनपा कार्यक्षेत्रात येतो. अतिशय उच्चभ्रू मतदारांची याठिकाणी मोठ्या प्रमाणात भरणा आहे. कन्नड चित्रपट निर्मिती येथून मोठ्या प्रमाणात होते. असे असले तरी अनेक समस्या याठिकाणी अनेक दिवसापासून ठाण मांडून बसल्या आहेत. त्यामुळे स्थानिकांच्या रोषाला त्यांना सामोरे जावे लागत आहे.याठिकाणी दिनेश गुंडूराव हे तिसर्‍यांदा निवडणूक लढवित आहेत. त्यांच्याविरोधात भाजपने ए. आर. सप्तगिरी गौडा, निजदने व्ही. नारायणस्वामी, एआयएडीएमकेचे एम. पी. युवराज यांच्यासह एकूण 12 उमेदवार रिंगणात आहेत.

येथील मतदार हा श्रीमंत आणि उच्चशिक्षित असला तरी  मतदानासाठी कमी प्रमाणात बाहेर पडतो. यामुळे राज्यात सर्वात कमी मतदान याठिकाणी होते. ही डोकेदुखी उमेदवारांनी सतत भेडसावत असते. 2008 च्या विधानसभा निवडणुकीत दिनेश गुंडूरावना केवळ 8 हजारचे मताधिक्य मिळाले होते. त्यावेळी त्यांनी भाजप खा. एम. पी. मोहन यांचा पराभव केला होता. 2013 मध्ये यात वाढ झाली. त्यावेळी 22 हजारच्या मताधिक्याने त्यांचा विजय झाला. यातून त्यांची लोकप्रियता दिसून येते. 

माजी मुख्यमंत्री आर. गुंडूराव यांचे सुपुत्र असणार्‍या दिनेश गुंडूरावना वडिलांचा राजकीय वारसा मिळाला आहे. त्या जोरावर त्यांनी याठिकाणी आपले अस्तित्व निर्माण केले आहे. मतदारसंघात सहा मनपा प्रभागांचा समावेश आहे. यामध्ये पाच काँग्रेसकडे असून केवळ एक प्रभाग भाजपच्या ताब्यात आहे. याचा फायदा दिनेश गुंडूरावना होणार आहे. 

भाजपने दिनेश गुंडूरावना शह देण्याचा प्रयत्न वारंवार चालविला आहे. परंतु भाजपची भिस्त असणारा बुद्धिजीवी मतदार मतदानासाठी बाहेर पडत नसल्याने त्यांची डोकेदुखी वाढली आहे. मतदानामध्ये प्रामुख्याने मध्यम आणि कनिष्ठ वर्गातील मतदार सहभागी होतात. हे प्रामुख्याने काँग्रेसचे परंपरागत मतदार आहेत. त्यामुळे काँग्रेसशी टक्‍कर देताना भाजपला अडचण येत आहे.

याठिकाणी तामिळी मतदारांची संख्यादेखील अधिक आहे. यामुळे एआयएडीएमके (अण्णा) ने उमेदवार दिला आहे. यातून काँग्रेसच्या मतात घट करण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे. मात्र मतदार भाजपला कितपत साथ देतात, यावर काँग्रेसचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. या मतदारसंघात निधर्मी जनता दलाकडून अस्तित्व दाखविण्याचा प्रयत्न याठिकाणी करण्यात येत आहे. ‘आप’ नेदेखील याठिकाणी उमेदवार दिला असून उच्चभ्रू लोकांना मतदानाचे आवाहन केले आहे.