Sun, Jul 21, 2019 01:29होमपेज › Belgaon › सट्टेबाजांची पहिली पसंती भाजपला!

सट्टेबाजांची पहिली पसंती भाजपला!

Published On: Apr 19 2018 1:34AM | Last Updated: Apr 18 2018 11:51PMबंगळूर : प्रतिनिधी

कर्नाटक विधानसभा निवडणुकीस एक महिन्यापेक्षाही कमी वेळ असताना आता राज्यातील बेटिंग उद्योग सक्रिय झाला आहे. निवडणूकपूर्व सर्वेक्षणात कर्नाटकात त्रिशंकू विधानसभा असा अंदाज वर्तविला गेला असताना भाजप हा बुकिंगचा फेव्हरिट पक्ष बनला आहे. भाजप 130 जागा जिंकेल, असा सट्टेबाजांचा अंदाज असून, त्यांनी भाजपसाठी  बेटिंगचा भाव 10 रुपयांना 11 रुपये असा दिला आहे. (म्हणजे भाजपवर 10 रुपये लावले आणि भाजपला बहुमत मिळाले, तर सट्टा खेळणार्‍याला 21 रुपये मिळतात.) तर दुसरा फेव्हरिट पक्ष काँग्रेस असून त्याचा भाव आहे 10 रुपयांना 25 रुपये. तिसर्‍या पसंतीचा पक्ष निधर्मी जनता दल असून, जादुई संख्या गाठणे अशक्य असल्याने या पक्षासाठी भाव आहे 10 रुपयांना 60 रुपये.

बंगळूरमध्ये मार्केटमध्ये पक्षनिहाय बेटिंगचा व्यवसाय 750 ते 800 कोटींचा आहे. याशिवाय एकदा उमेदवारांची नावे निश्‍चित झाल्यानंतर त्या त्या मतदारसंघांत उमेदवारनिहाय बेटिंग सुरू होते.  गेल्या आठवड्यात ‘इंडिया टुडे’ने कर्नाटक विधानसभा त्रिशंकू होण्याचा अंदाज वर्तवला होता. त्यामुळे भाजपचा भाव 96 पैशांनी घसरला. आधी तो 11 रुपयांपेक्षा जास्त होता. ‘इंडिया टुडे’च्या निवडणूक सर्वेक्षणात काँग्रेस पक्ष 90 ते 101 जागा जिंकेल, तर भाजपला 78 ते 86 जागा मिळतील, असा अंदाज वर्तविला असून, किंग मेकरचा मान मिळू शकणार्‍या निधर्मी जनता दलाला 34 ते 43 जागा मिळतील, असे म्हटले आहे. निजदच्या बाबतीत गेल्या निवडणुकीतही हीच स्थिती होती.