होमपेज › Belgaon › बदामीतून सिद्धरामय्यांविरुद्ध श्रीरामलू 

बदामीतून सिद्धरामय्यांविरुद्ध श्रीरामलू 

Published On: Apr 25 2018 2:02AM | Last Updated: Apr 25 2018 1:01AMबंगळूर : प्रतिनिधी

चामुंडेश्‍वरीसह बदामी मतदारसंघातूनही लढण्याचा निर्णय घेतेलेल्या मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी मंगळवारी बदामीतून अर्ज दाखल केला. तर सिद्धरामय्यांना पराभूत करण्याचा चंग बांधलेल्या भाजपने तुल्यबळ उमेदवार म्हणून खा. श्रीरामलू यांना बदामीतून उतरवले असून, त्यांनीही मंगळवारी अर्ज दाखल केला.  लिंगायत, धनगर, वक्कलिग असे संमिश्र मतदार असलेल्या बदामी मतदारसंघात आपला प्रभाव पाडून मते मिळविण्यासाठी राष्ट्रीय पक्षांच्या  या  दोन मातब्बर नेत्यांनी आटापिटा चालविला आहे.

सिद्धरामय्या हे बदामीतून अर्ज दाखल करताना त्यांच्यासमवेत बागलकोटचे पालकमंत्री आर.बी.तिम्मापूर, बी.बी.चिम्मनकट्टी, देवराज पाटील आदी ज्येष्ठ नेते होते. बदामी येथून हेलिकॉप्टरने बंगळूरकडे  निघाले असताना मार्गावर हुबळीनजीक हेलिपॅडवर मुख्यमंत्री काही काळ थांबले. तेथे पत्रकारांसमोर ते म्हणाले, बदामीत एकच दिवस आपण प्रचारदौरा करणार असून उर्वरित प्रचार ज्येष्ठ मंत्री, समर्थक करतील. दोन्ही मतदारसंघातून विजयाची खात्री आहे. दरम्यान, अ.भा.काँग्रेसचे कार्यवाह सतीश जारकिहोळी यानी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या बदामीतील प्रचारकार्यात आपण सहभाही होणार असल्याचे जाहीर केले आहे.

Tags : BJP, Sriramulu, Siddaramaiah, Badami