होमपेज › Belgaon › भाजप विरोधकांचे शक्‍तिप्रदर्शन

भाजप विरोधकांचे शक्‍तिप्रदर्शन

Published On: May 23 2018 1:07AM | Last Updated: May 23 2018 12:18AMबंगळूर : वृत्तसंस्था 

काँग्रेस-जेडीएस आघाडीचे एच. डी. कुमारस्वामी बुधवारी कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असून, यावेळी देशातील अनेक दिग्गज नेतेही उपस्थित राहणार आहेत. यानिमित्ताने शक्‍तिप्रदर्शन करून भाजपला इशारा देण्याचे मनसुबे विरोधकांचे आहेत. दरम्यान, काँग्रेसचे नेते जी. परमेश्‍वर उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत, तर सभापती, उपसभापती, तसेच काही मंत्र्यांची निवडही बुधवारी होणार असून, गुरुवारी खातेवाटप जाहीर केले जाईल, अशी माहिती कुमारस्वामी यांनी दिली. 

दिग्गज नेते येणार

शपथविधीस ‘संपुआ’च्या प्रमुख सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, बसपच्या प्रमुख मायावती, पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, सपाचे प्रमुख अखिलेश यादव, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आदी प्रमुख नेते उपस्थित राहणार असून, या माध्यमातून विरोधकांची एकी होत असल्याचे संकेत देत भाजपला इशारा देण्याचा इरादा आहे. जेडीएसचे प्रमुख एच. डी. देवेगौडा यांनी मंगळवारी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनाही निमंत्रण दिल्याचे वृत्त आहे. तामिळनाडूतील राजकारणात नुकताच प्रवेश केलेला अभिनेता कमल हसननेही आपण शपथविधी समारंभास उपस्थित राहणार असल्याचे जाहीर केले आहे. विधानसभा निवडणुकीत 104 जागा पटकावून सर्वात मोठा पक्ष झालेल्या भाजपला बहुमत सिद्ध करण्यात अपयश आल्यानंतर

राज्यपालांनी काँग्रेस-जेडीएस आघाडीला सरकारस्थापनेसाठी पाचारण केले. मंत्रिमंडळाचे स्वरूप नेमके कसे असावे, यासंदर्भात मंगळवारी संध्याकाळी कुमारस्वामी, काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, के. सी. वेणुगोपाल, मल्‍लिकार्जुन खर्गे, डी. के. शिवकुमार या नेत्यांची बैठक झाली. त्यात उपमुख्यमंत्रिपदासाठी परमेश्‍वर यांच्या नावावर शिक्‍कामोर्तब करण्यात आले.