Sun, Mar 24, 2019 10:26होमपेज › Belgaon › निवडणुकीत उत्तर कर्नाटकाचा भाजपला हात

निवडणुकीत उत्तर कर्नाटकाचा भाजपला हात

Published On: May 17 2018 1:28AM | Last Updated: May 17 2018 12:59AMबेळगाव : प्रतिनिधी 

राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपच्या एकूण जागांमध्ये 74 ने वाढ झाली. त्यापैकी तब्बल 28 जागा एकट्या उत्तर कर्नाटकातून वाढल्या आहेत. तर काँग्रेसच्या 17 जागा घटल्या आहेत. त्यामुळे बहुमतापर्यंत पोहोचण्यात अपयश आले तरी भाजपला सर्वात मोठे यश उत्तर कर्नाटकातच मिळाल्याचे स्पष्ट झाले.

2008च्या निवडणुकीतही भाजपला उत्तर कर्नाटकानेच हात दिला होता. त्याची पुनरावृत्ती यंदाच्या निवडणुकीत झाली आहे. उत्तर कर्नाटकाच्या 11 जिल्ह्यांमधील 90 जागांपैकी भाजपने 46 जागा पटकावल्या. तर काँग्रेसला 37 जागाच मिळवता आल्या. भाजपला किनारपट्टी भागात मिळालेले यश यामध्ये समाविष्ट केले तर हा आकडा आणखी  वाढतो.

किनारपट्टी भागात भाजपला यंदा 30 जागा मिळाल्या आहेत. गेल्यावेळी भाजपच्या केवळ 13 जागा होत्या. म्हणजेच 17 जागांची वाढ झाली आहे. तर काँग्रेसच्या जागा 31 वरून 14 ने कमी होऊन 17 वर पोहोचल्या आहेत. थोडक्यात काँग्रेसचे जे अपयश ते भाजपचे यश ठरले आहे. बीदर, गुलबर्गा, विजापूर, रायचूर, बागलकोट, बेळगाव, धारवाड, गदग, हावेरी कोप्पळ, यादगीर, बळ्ळारी या 12 जिल्ह्यांनी भाजपला भरारी दिल्याने त्यांना पुन्हा सत्तास्वप्न पाहणे शक्य झाले आहे.

काय आहेत कारणे?

म्हादईचे पाणी मलप्रभेत सोडणे व लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्माची मान्यता मिळवून देण्यासाठी हट्टाला पेटलेल्या सिद्धरामय्या नेतृत्वातील काँग्रेस सरकारला हे दोन्ही विषय मुंबई?कर्नाटक प्रदेशात यंदाच्या निवडणुकीत कलाटणी देणारे ठरले आहेत. जोडीला बेळगाव जिल्ह्यात काँग्रेसमध्ये गटबाजी, धारवाड येथे विनय कुलकर्णी यांच्यावर खुनाचा आरोप, बागलकोट येथे एच.वाय.मेटी यांच्यावर दाखल झालेल्या लैंगिक प्रकरणाचा आरोप, मुस्लिमांचे तुष्टीकरण यासारख्यामुळे काँग्रेस पक्षाला झळा पोहोचल्या. त्याचा परिणाम उमेदवारांच्या राजकीय भवितव्यावर झाला. गेल्या निवडणुकीत  काँग्रेसची वाटचाल कृष्णेच्या दिशेने या घोषणेने पदयात्रा सुरू केली होती. यातून मतदारांची मने वळविण्यात काँग्रेस यशस्वी ठरले होते. यावेळी मात्र म्हादईचा प्रश्‍न उपस्थित करून मते मिळविण्यात काँग्रेसला यश आले नाही.