Sun, Aug 18, 2019 14:23होमपेज › Belgaon › भाजपमधील वाद काँग्रेसच्या पथ्यावर?

भाजपमधील वाद काँग्रेसच्या पथ्यावर?

Published On: May 09 2018 1:50AM | Last Updated: May 09 2018 12:13AMबंगळूर : प्रतिनिधी  

धारवाड जिल्ह्याचे विभाजन होऊन हावेरी जिल्ह्याची निर्मिती झाली. दोन दशके झाली तरी या जिल्ह्याने स्वत:चे अस्तित्व निर्माण केलेले नाही. अहिंद चळवळ, केजेपीची स्थापना, संगोळ्ळी रायण्णा ब्रिगेड राज्यस्तरीय मेळावा, कार्यकर्त्यांतील वादाचा साक्षीदार असणार्‍या हावेरीत सर्वांना बरोबरीने घेऊन जाणार्‍या नेत्याचा सर्वच पक्षांमध्ये अभाव आहे. भाजपमधील वाद काँग्रेसच्या पथ्यावर पडणार का, हे पाहावे लागेल.

शिग्गावात भाजपचे सोमण्णा आणि राणेबेन्नूरमध्ये काँग्रेसच्या रुक्मिणी सावकार अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. हानगल येथे काँग्रेसने उमेदवारी नाकारल्याने आ. मनोहर ताशिलदार तसेच चंद्रप्पा जालगार अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. ब्याडगीत काँग्रेस आमदार बसवराज शिवण्णा यांना उमेदवारी मिळाली नाही. हावेरीतून बारा इच्छुकांपैकी एकाला उमेदवारी देण्याची शिफारस जिल्हा भाजप अध्यक्ष शिवराज सज्जनर यांनी वरिष्ठांकडे केली होती. मात्र, माजी आमदार नेहरू ओलेकार यांना उमेदवारी देण्यात आली. निजदमध्येही बंडखोरी असून ब्याडगी, हिरेकेरूर, हानगलमध्ये नाराज उमेदवार रिंगणात आहेत.

काँग्रेसकडून पाच वर्षातील कामगिरीच्या आधारे मतयाचना केली जात आहे. भाजप आणि निजदकडून काँग्रेस सरकारच्या अपयशाचे अस्त्र वापरण्यात येत आहे. भरपूर आश्‍वासने देण्याचे सत्र त्यांच्याकडून सुरू आहे. हानगलमध्ये 1983 ते 2013 मध्ये सी. एम. उदासी आणि मनोहर ताशिलदार एकमेकांचे प्रतिस्पर्धी होते. यंदा विधान परिषद सदस्य श्रीनिवास माने काँग्रेस उमेदवार असून उदासी यांच्याविरुद्ध निजदचे बोम्मनहळ्ळी बाबू रिंगणात आहेत.

हावेरी राखीव मतदारसंघात काँग्रेसचे रुद्राप्पा लमाणी रिंगणात असून भाजपचे ओलेकार त्यांचे प्रतिस्पर्धी आहेत. दोघांच्या कार्यकाळात झालेल्या विकासकामांची तुलना करून मतदार कौल देतील, असा विश्‍वास लमाणी यांना आहे. राणेबेन्नूरमध्ये वाळू माफियांची चर्चा आहे. 1972 मध्ये पहिल्यांदा विजयी झालेले काँग्रेस उमेदवार के. बी. कोळीवाड यावेळी दहाव्यांदा निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरुद्ध केपीजीपी उमेदवार आर. शंकर रिंगणात आहेत. शंकर यांनी गत निवडणुकीत कोळीवाड यांच्या विजयात अडचण निर्माण केली होती. भाजपच्या सोळा इच्छुकांतून उमेदवारी मिळविणारे डॉ. बसवराज केलगार यांच्यामुळे येथे तिरंगी लढत होणार आहे.

शिग्गाव-सावनूर येथे गत निवडणुकीत केजेपीतून निवडून आलेले बसवराज बोम्माई यांच्यामागे सोमण्णा बेवीनमरद यांनी हातभार लावला होता. यंदा बेवीनमरद अपक्ष म्हणून रिंगणात असल्याने चुरस आहे. यामुळे पंचमसाळी आणि सादर मतांचे विभाजन होण्याची शक्यता आहे. येथून पराभवाची हॅट्ट्रिक साधण्याची तयारी करणारे काँग्रेसचे अज्जमपीर खादरी पारंपरिक मतांवर अवलंबून आहेत. 

कार्यकर्त्यांत अजूनही वादाची मानसिकता

वर्षभरापूर्वी येथे बुरखा आणि केसरी शालीचा वाद, नथुराम गोडसे पुतळा उभारण्याची घोषणा, गणेशोत्सवात डॉल्बीचा वापर, पाकिस्तान ध्वजाचा वाद, व्हॉटस्अ‍ॅपवरून खोट्या बातम्यांचा प्रसार असे हिंदुत्वाचे प्रयोग केले. मात्र, त्यापेक्षा केजेपी आणि भाजपमधील वादाचा मुद्दा  चर्चेचा ठरला. सध्या भाजपमधील वाद संपुष्टात आल्याचे जाणवत असले तरी भाजप, केजेपी आणि संगोळ्ळी रायण्णा ब्रिगेडमधील कार्यकर्ते त्याच वादाच्या मानसिकतेत आहेत.