Fri, Mar 22, 2019 01:28
    ब्रेकिंग    होमपेज › Belgaon › अयोध्यानगर रस्ता रुंदीकरणाविरुद्ध रोष

अयोध्यानगर रस्ता रुंदीकरणाविरुद्ध रोष

Published On: Feb 24 2018 1:15AM | Last Updated: Feb 23 2018 11:33PMबेळगाव : प्रतिनिधी

स्मार्ट सिटी प्रकल्पातून अयोध्यानगर-गोडसेवाडीचा रस्ता 80 फूट करण्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली असतानाच, स्थानिक रहिवाशांनी  आज जिल्हाधिकार्‍यांकडे धाव घेतली आणि रस्ता 60 फुटीच करण्याची मागणी केली. सारे रहिवाशी गरीब असल्याने त्यांच्याकडे पर्यायी जागा किंवा घरे नाहीत, ही स्थितीही अधिकार्‍यांना समजावून सांगण्यात आली.

सध्या 60 फुटाचा रस्ता आहे.रस्ता रुंदीकरणानंतर 16 कुटुंबांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे रुंदीकरण करण्यात येऊ नये, अशा मागणीचे निवेदन येथील रहिवासी व श्रीराम सेनेतर्फे जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले. 

निवेदनात म्हटले आहे की, या रस्त्यावर घरे, दुकाने, इमारती आहेत. रस्ता रुंदीकरणात अनेकांची घरे काढण्यात येणार आहेत. यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर येतील. धारवाड उच्च न्यायालयातून रस्ता रुंदीकरणाविरोधात रहिवाशांना स्थगिती मिळाली आहे. मात्र, यांनतरही समस्या कायमच आहे. महापालिकेच्या माध्यमातून घरे कधीही पाडण्यात येतील, अशी भीती स्थानिकांना आहे. त्यामुळे रस्ता रुंदीकरणाचा निर्णय रद्द करावा. 

यावेळी श्रीराम सेनेचे अध्यक्ष रमाकांत कोंडूसकर यांच्यासह दिलीप कोल्हापूरे, आप्पासाहेब पिंपळे, यल्लाप्पा जोशीलकर, लक्ष्मण जोशीलकर, प्रशांत राठोड, विष्णू जाधव, अनिल जाधव यांनी आपली समस्या मांडली.  रुंदीकरणग्रस्तांपैकी पिंपळे हे माजी सैनिक असून त्यांनी निवृत्त सैनिक संघटनेही दाद मागितली आहे. शिवाय रुंदीकरणाचा निर्णय कायम राहिल्यास दयामरणाची मागणीही त्यांनी केली आहे.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर, संजय साळवी, लक्ष्मी साळवी, पार्वती पाटील, पूजा कोल्हापूरे, लक्ष्मी जोशीलकर, कांचन जोशीलकर, दिनेश कोल्हापूरे उपस्थित होते.