Wed, Mar 20, 2019 22:56होमपेज › Belgaon › पोस्ट खात्यातील योजनांबद्दल हवी जागृती

पोस्ट खात्यातील योजनांबद्दल हवी जागृती

Published On: Aug 26 2018 1:27AM | Last Updated: Aug 26 2018 12:51AMबेळगाव : प्रतिनिधी

पोस्ट विभागातर्फे अनेक योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. बेळगाव पोस्ट कार्यालयामार्फत नागरिकांसाठी विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येते. कार्यालयात राबविण्यात येणार्‍या प्रत्येक योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.  मात्र, योजनांच्या जागृतीत केंद्र व राज्य सरकारची उदासीनता दिसून येत आहे. याचा फटकाही लाभधारकांना बसत आहे.

पोस्ट विभागातर्फे बचत खाते, मुदत ठेव योजना, मासिक उत्पन्न योजना, वरिष्ठ नागरिक योजना, राष्ट्रीय बचत पत्र, सुकन्या समृद्धी योजना, किसान विकास पत्र, सार्वजनिक भविष्य निधी यासारख्या योजना राबविण्यात येत आहेत.  या योजनांच्या जागृतीत उदासनिता असल्याने सर्वसामान्यांपर्यंत या योजना पोहचणे मुश्किल बनले आहे. यासाठी पुढाकार घेऊन केंद्र व राज्य सरकारने पोस्टाच्या योजनांबद्दल जागृती करणे गरजेचे बनले आहे.

बचत खाते : या खात्यात कमीत 50 रुपयांपासून रक्कम भरू शकतो. यापुढे कितीही रक्कम ठेवू शकतो. जितकी रक्कम जमा होते त्या रकमेवर वर्षाला 4 टक्के दराने व्याज मिळते. ही रक्कम काढण्यासाठी एटीएम सुविधा देण्यात आली आहे. रक्कम काढल्यानंतर मोबाईलवर संदेश मिळतो, यासाठी कोणतेही सर्व्हिस चार्ज नाही.

आरडी खाते (5 वर्षे) : या खात्याचा कालावधी 5 वर्षांचा आहे. महिन्याला 10 रुपयांपासून कितीही रक्कम जमा करू शकता. 6.9 टक्के व्याज मिळते. आरडीचा कालावधी 5 वर्षांचा असला तरी मध्यंतरी गरज भासल्यास 3 वर्षानंतर रक्कम काढता येते. 

मासिक ठेव योजना (5 वर्षे) : कमीत कमी 100 रुपये खात्यावर भरू शकतो. एका व्यक्तीसाठी खात्यावर 4.5 लाख तर संयुक्त खात्यावर 9 लाखांपर्यंत रक्कम ठेवू शकतो. 1 लाख रकमेवर महिन्याला 608 रुपये व्याज 7.3 टक्के दराने खात्यार जमा होते. 

1 वर्ष डिपॉझिट (टीडी) : कमीत कमी 100 रुपये खात्यावर भरू शकतो. वर्षाला 10 हजार रुपये खात्यावर निश्‍चित ठेवल्यानंतर वर्षाला 6.6 टक्के व्याजदराने 677 रुपये व्याज मिळणार आहे. 1 वर्षे रक्कम डिपॉझिट ठेवून गरज भासल्यास 6 महिन्यानंतर रक्कम खात्यातून काढल्यास 4 टक्के दराने व्याज मिळते. 

2 वर्ष डिपॉझिट (टीडी) : कमीत कमी 100 रुपये खात्यावर भरू शकतो. खात्यावर 10 हजार रुपये ठेवले तर दोन वर्षांनी 11 हजार 374 रुपये मिळतात. यासाठी 6.7 टक्के व्याजदर आहे. 2 वर्षे रक्कम डिपॉझिट ठेवून गरज भासल्यास 6 महिन्यानंतर रक्कम खात्यातून काढल्यास 4 टक्के व्याजदराने व्याज मिळते.

3 वर्ष डिपॉझिट (टीडी) : कमीत कमी 100 रुपये खात्यावर भरू शकतो. 10 हजार जमा केल्यानंतर 6.9 टक्के व्याजदराने 12 हजार 124 रुपये मिळतील. 3 वर्षे रक्कम डिपॉझिट ठेवून गरज भासल्यास 6 महिन्यानंतर रक्कम खात्यातून काढल्यास 4 टक्के दराने व्याज मिळते.

5 वर्ष डिपॉझिट (टीडी) : कमीत कमी 100 रुपये खात्यावर भरू शकतो. 10 हजार रुपये गुंतविले तर 5 वर्षांनी 7.4 टक्के व्याजदराने 13 हजार 801 रुपये मिळणार आहेत. 5 वर्षे रक्कम डिपॉझिट ठेवून गरज भासल्यास 6 महिन्यानंतर रक्कम खात्यातून काढल्यास 4 टक्के दराने व्याज मिळते.