Mon, Dec 17, 2018 00:00होमपेज › Belgaon › स्वयंचलित यंत्रे करताहेत वाहनांचे सर्वेक्षण

स्वयंचलित यंत्रे करताहेत वाहनांचे सर्वेक्षण

Published On: Feb 24 2018 1:15AM | Last Updated: Feb 23 2018 11:25PMबेळगाव : प्रतिनिधी

रस्त्यांच्या सुधारणेसाठी राज्यभरात सार्वजनिक बांधकाम खात्याकडून रस्त्यांवरून धावणार्‍या वाहनांचे सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे. मात्र, यंदाच्या सर्वेक्षणाचे वैशिष्ट्य म्हणजे पहिल्यांदाच मनुष्यबळाऐवजी स्वयंचलित यंत्राचा वापर करण्यात येत आहे. कर्मचार्‍यांची कमतरता हे यामागचे एक कारण आहे.

सार्वजनिक बांधकाम खात्याकडून प्रत्येकवर्षी रस्त्यांचा दर्जा व वाढत्या वाहनांची संख्या याचे सर्वेक्षण करण्यासाठी ठिकठिकाणी रस्त्यांवर तंबू ठोकून कर्मचार्‍यांच्या सहाय्याने सर्वेक्षण केले जाते. वाहनांची संख्या वाढल्यास रूंदीकरणाबाबत निर्णय घेतला जातो. 

यंदा मात्र पहिल्यांदाच या प्रक्रियेला फाटा देऊन स्वयंचलित यंत्राच्या माध्यमातून हा सर्वे करण्यात येत आहे. कर्मचार्‍यांच्या माध्यामतून करण्यात येणारा सर्वे तंतोतंत असणे अशक्य आहे. यासाठीच बेळगाव, विजापूर आणि बागलकोट जिल्ह्यामध्ये वाहनांच्या सर्वेक्षणासाठी एटीसीसी   (ऑटोमॅटिक ट्रॅफिक काऊंटर्स कम क्‍लासिफायर्स) हे यंत्र सतत 48 तास निरंतरपणे वाहनांची संख्या संग्रहित 
करते. 

22 यंत्रांकडून मोजणी

बेळगाव सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अंतर्गत येणार्‍या तीन जिल्ह्यामंधील 22 उपविभाग आहेत. यामध्ये वाहतूक सर्वेक्षणासाठी 381 ठिकाणांची नोंद करून घेण्यात आली आहे. त्यापैकी उपविभागाला 1 प्रमाणे बेळगावसाठी 11, बागलकोटसाठी 6, विजापूर येथे 5 अशा  एकूण 22 ठिकाणी एटीसीसी यंत्र बसविण्यात आले आहे. उर्वरित ठिकाणी कर्मचार्‍यांच्या माध्यमातून जुन्याच पध्दतीने सर्वेक्षण करण्यात येत आहे. 

सर्वेक्षण कशासाठी?

वाढत्या वाहनांची संख्या लक्षात घेऊन विशिष्ट रस्त्याचे रुंदीकरण आवश्यक आहे का, सूचनाफलक-दिशादर्शक फलक आवश्यक आहेत का याची चाचपणी करण्यासाठी  वाहनांची मोजणी आवश्यक असते.  वाहनांच्या संख्येवरून रस्त्याचा दर्जा ठरवून सुधारणा केली जाते. 

रस्त्यांचे वर्गीकरण कशासाठी?

रस्त्यासाठी निधी कोणत्या खात्याने द्यायचा, रस्ता बांधणीचे काम कुणी करायचे हे ठरवण्यासाठी रस्त्यांचे वर्गीकरण केले जाते. जिल्ह्यातील रस्ते जिल्हा पंचायत करते. तर राज्य महामार्ग राज्यातील महामार्ग विकास प्राधिकरण करते. राष्ट्रीय महामार्गाची बांधणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण करते.

अचूक माहिती उपलब्ध व्हावी यासाठीच अद्ययावत एटीसीसी यंत्राचा उपयोग करून घेण्यात येत आहे. मुंबई येथील समर्थ स्वॉफ्टटेक या कंपनीला कंत्राट देण्यात आले आहे. अशी माहिती बांधकाम खात्याचे मुख्य अभियंता एच. सुरेश यांनी दिली.